शाळेतील जागतिक पर्यावरण दिन (SSC 2025)
आज, ५ जून जागतिक पर्यावरण दिन, त्यानिमित्त वृक्ष दिंडी आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम आमच्या शाळेत ज्ञानसागर विद्यालय सांगली येथे संपन्न झाला. कार्यक्रम ८ वाजता सुरु होणार होता. आम्ही सगळे ७.३० ला पोहोचलो. शाळेचे पटांगण पताकांनी सजवले. आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी पर्यावरणाविषयी जनजागृती करणारे व घोषवाक्य लिहिलेले फलक बनवून आणले होते.
“झाडे लावा, झाडे जगवा!”, “पर्यावरणाचे रक्षण, जीवनाचे संरक्षण!” अशा घोषणांनी सारा परिसर दुमदुमला होता. बालवृक्षांना डोक्यावर घेऊन वृक्षदिंडी गावातील मुख्य रस्त्यातून फिरत होती. आम्ही सर्व मोठमोठ्याने घोषणा देत होतो. अनेक गावकरी सुद्धा दिंडी बघण्यासाठी रस्त्यावर आले. काही लोकांनी तर दिंडीवर फुलांचा वर्षाव करून दिंडीचे स्वागत केले.
फिरून दिंडी पुन्हा शाळेच्या आवारातील मैदानात आली. प्रत्येकाने फळझाडे, फुलझाडे व औषधी झाडांची लागवड शाळेच्या परिसरात केली. कार्यक्रमानंतर शाळेच्या प्रांगणात छोटेखानी समारंभ घेण्यात आला. मुख्याध्यापकांनी पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले. फक्त झाडे लावून आपले काम संपत नाही तर त्यांची काळजी घेऊन ती व्यवस्थित रित्या वाढली पाहिजेत व जगली पाहिजेत असे देखील त्यांनी सर्वांना समजवून सांगितले. विद्यार्थ्यांनी पर्यावरण विषयक कविता, गाणी आणि लघुनाटिका सादर केली.
या संपूर्ण कार्यक्रमातून आम्हाला पर्यावरणप्रेम, सामाजिक जबाबदारी आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समजले. खरोखरच, हा एक अविस्मरणीय व प्रेरणादायी प्रसंग होता.