चांदोबा चांदोबा भागलास का
निंबोणीच्या झाडामागे लपलास का
निंबोणीचे झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी
मामाच्या वाड्यात येऊन जा
तूप-रोटी खाऊन जा
तुपात पडली माशी
चांदोबा राहिला उपाशी

ससे पांढरे खाती गाजर
उंदीर खाते काळी मांजर
घाली दोघे कपडे रेशम
चमकते डोळे करडे चमचम

तात्यांना होती दाढी
अण्णांना होती शेंडी
तात्यांना आवडी भोपळा
अण्णांना आवडे भेंडी
अण्णांनी खाल्ला भोपळा
तात्यांनी खाल्ली भेंडी
अण्णांना आली दाढी
तात्यांना फुटली शेंडी

ये ग ये ग गाई गोठ्यात
बाळाला दूध देई वाटीत
बाळाची वाटी मांजर चाटी
मांजर गेले रागाने
तिला खाल्ले वाघाने
वाघ मामा डूलतो
अस्वल मामा पोळ्या करतो
एक पोळी करपली
दुधा संगे वरपली
दूध लागले कडू
बाळाला आले रडू
बाळ गेले झोपी
बाळाला घातली टोपी

एक होता तात्या
दुसरा होता मोत्या
तात्या होता लबाड
मोत्या होता खादाड
तात्या ने आणले वडे
मोत्या म्हणतो जाडे जाडे
तात्याने आणली केळी
मोत्या म्हणतो शिळी शिळी
तात्याने आणली छडी
मोत्याने मारली उडी

गणितातले आकडे झाले एकदा वाकडे
एकाला फुटले डोळे दोन म्हणाले ओके
तीन चा खूप थाट चारच्या पोटात गाठ
पाचला एकच पाय सहाला उंचीच नाय
सातची आडवी पाठ नाकात आडवा आठ
नऊ चा डोळा गोल दहा चा वेगळा तोल

एक दोन एक दोन
बाबांचा आला मला फोन
तीन चार तीन चार
कुल्फी खाऊ थंडगार
पाच सहा पाच सहा
पिऊ नका कधीही चहा
सात आठ सात आठ
मस्ती केली तर आईशी गाठ
नऊ दहा नऊ दहा
आकाशातला चांदोबा पाहा

बटाटा माझे नाव
माती माझे गाव
माझा बनतो वडापाव

एक होती इडली
पळता पळता पडली
सांबरात जाऊन बुडाली
चमचा आला खुशीत
जाऊन बसला बशीत
चमचा ने पाहिले इकडे तिकडे
इडलीचे केले तुकडे तुकडे .

ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा

अड्गुल मड्गुल
सोन्याचं कडगुलं
रूप्याचा वाळा
तान्ह्या बाळा
तीट टिळा

भाजक गुणिले भागाकर
त्यात बाकी मिळवावी
म्हणजे भाग्य येते ही
युक्ती ध्यानी धरावी

लहान माझी बाहुली
मोठी तिची सावली
घारे डोळे फिरविते
लुकलुक ही पहाते
नकटे नाक उडविते
गुबरे गाल फुगविते

आपडी थापडी गुळाची पापडी
धम्मक लाडू तेल काढू
तेलंगीचे एकच पान
दोन हाती धरले कान
चाऊ माऊ चाऊ माऊ ……

खबडक खबडक घोडोबा
घोड्यावर बसले लाडोबा
लाडोबाचे लाड करतय कोण
आजोबा–आजी मावश्या दोन