‘आजादी चे  अमृत महोत्सव’ हे भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाले म्हणून भारत सरकारने सुरु केलेले एक पर्व आहे. स्वातंत्र्याच्या ७५  अमृत वर्षांमध्ये कोणकोणत्या गोष्टी भारताने प्राप्त केल्या, आत्मसात केल्या, स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष झाली म्हणून सिंहावलोकन आणि संकल्प त्यात आहे. ज्यामुळे भारताला आपली स्वप्न साकार करण्यासाठी दिशा आणि प्रेरणा मिळेल.

या महोत्सवाची सुरुवात २१ मार्च २०२१ ला दांडी यात्रेला ज्यादिवशी ९१ वर्ष पूर्ण झाली त्या दिवशी करण्यात आली आहे. दांडी यात्रा मीठासाठी गांधीजींनी केली जे ‘मीठ’ भारताच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे.  केंद्र सरकारने या महोत्सवाला २०२३ पर्यंत वाढवण्याचा देखील निर्णय केला आहे. 

आझादी (स्वातंत्र्य)  मिळवण्यासाठी आपल्या देशातील अनेक नागरिकांनी आपले बलिदान दिले आहे, अनेक त्याग केले आहेत. ज्यामुळे आज ७५ वर्षानंतर ही आपण स्वातंत्र्याची गोड फळे चाखत आहोत. याची आपण जाणीव ठेवली पाहिजे. स्वातंत्र्य मिळाले खरे पण आपल्या देशाची फाळणी झाली. ज्या अखंड भारताचे स्वप्न अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी पहिले होते. ते पूर्ण झाले नाही. त्याला गालबोट लागले.

जो मृत नाही तो अमृत.‘अमृत’ म्हणजे अमर. हे स्वातंत्र्य आपण कायम अमर ठेवले पाहिजे. ज्यामुळे भारत देश हा सर्व विश्वात अमर होईल. पूर्वीच्या काळी भारताला ‘सोने कि चिडिया’ संबोधले जायचे. ज्या सोन्याची चमक ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगाल, डच लोकांना भारताकडे घेऊन आली. ती चमक आपल्या कर्तृत्वाने भारतात पुन्हा निर्माण करण्याचा निर्धार भारत अमृत महोत्सवी करत आहे.

परप्रांतीय आंग्ल, मुघल, आदिलांच्या गुलामीच्या बेड्या तर भारतीयांनी काढून फेकून दिल्या. पण आपल्या स्वतःच्याच बेरोजगारी, अंधश्रद्धा, मागासलेपणा, पुरुषप्रधानता, जातीयवादाच्या बेड्या अजूनही आपण बाळगत आहोत. जे भारताला अजूनही मागे खेचत आहेत.

तरीही आजचा भारतीय युवानाला स्वतःची खरी ओळख पटली आहे. हा युवान भारताकडे असलेले बुद्धिप्रामाण्यता, सत्यनिष्ठा, मनुष्यबळ, सांस्कृतिक भौगोलिक विविधता हि बलस्थान भारताने ओळखून पुन्हा एकदा ‘विश्व गुरु’ बनण्याचे स्वप्न साकार करेल.

कवी रवींद्रनाथ टागोर परमेश्वराला आपल्या कवितेत प्रार्थना करतात त्याप्रमाणे 

“चित्त जिथे भीतिशून्य उंच जिथे माथा

ज्ञान जिथे मुक्त तिथे जागृत करी नाथा

हृदयाच्या गाभ्यातून शब्द जिथे जन्मे

पूर्णाप्रत वाहतात अविश्रांत कर्मे

जेथ कर्मकांड बनुनी वाळूराशी

वैचारिक स्रोतपंथ  मुळी ना  कधी ग्राशी

पुरुषार्थ न शतखंडित होय कधी जेथे

तूच स्फूर्ती कर्मांची, आनंदही  तेथे 

निजहस्ते करुनि पित्या, निर्दय आघात 

स्वर्गी अशा भारतास जागृत करी नाथा….”