‘’तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार.’’

आता हे वाक्य नुसतं बोलत राहायचे नाही, तर त्याचा अंगीकार करण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधन करताना पंतप्रधान मोदींनी भारतीय जनतेला आत्मनिर्भर बनण्याची हाक दिली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे केवळ भारतातीलच नाही, तर जगभरातील  खूप लोकांचा  मृत्यू झाला. मात्र त्याच वेळी हे मोठे संकट भारतासाठी स्वावलंबनाची मोठी संधी घेऊन आले असल्याचा विश्वास त्यांनी जनतेला दिला.

‘’जोडूनिया धन उत्तम व्यवहारे
उदास विचार वेच करी’
’   
 -समर्थ रामदास.

           आपल्या सामर्थ्याचे ,समृद्धीचे अंतिम लक्ष विश्वकल्याण हेच आहे. आपल्याला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले ,तसेच आता आपण आपल्या पायावर उभे राहणे, म्हणजेच सर्वदृष्टीने आत्मनिर्भर बनणे तितकेच गरजेचे आहे .आपल्याकडे जी प्रचंड नैसर्गिक संपत्ती आहे तिला जपून ठेवले पाहिजे आणि त्यात वाढ केली पाहिजे. किती दिवस आपण जगाला कच्चामाल पाठवून त्यांच्याकडून तयार माल विकत घेणार. ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. म्हणूनच पंतप्रधानानी  ‘आत्मनिर्भर भारत’ हा संदेश जनतेला दिला आहे.
 ‘’असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’’,
 ही विचारसरणी संपवून, 
‘’मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार’’, हा विचार अंगीकारला पाहिजे. 

 आत्मनिर्भर म्हणजे स्वयंपूर्ण. आपल्या गरजा आपणच पूर्ण करायच्या. स्वावलंबी बनायचे. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात स्वदेशीचा अंगीकार आपण केला होता, पण थोड्या दिवसांनी आपण पुन्हा परदेशी मालावर अवलंबून राहू लागलो. त्यामुळे आता पुन्हा आपल्याला संपूर्ण स्वदेशी चा वापर करावा, असे मोदींनी आवाहन केले आहे. “मेक इन इंडिया” या उपक्रमातून बर्‍याच परदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करून उद्योगधंदे चालू करत आहेत. तसे आता आपल्यालाही स्वतःचा उद्योग धंदा चालू करता येऊ शकतो, त्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या दर्जाची कर्ज व्यवस्था सुद्धा चालू केली आहे. आत्मनिर्भर भारताचे एक उत्तम उदाहरण द्यायचे झाले तर ते पीपीई किट च्या निर्मितीतून देता येईल. covid-19 त्या संकटा पूर्वी भारतात एकही पीपी किट ची निर्मिती होत नव्हती आणि आज भारतात दररोज दोन लाख पीपीई किट्स आणि दोन लाख N-95 मास्क बनत आहे. कोरोना वर प्रभावी ठरलेली लस सुद्धा आपण भारतातच बनवून संपूर्ण जगापूढे खूप मोठे उदाहरण ठेवले आहे. आपण संपूर्णपणे आर्थिक दृष्ट्या समृद्ध होण्यासाठी इतर देशांची मदत घ्यावीच लागेल, पण तरीही त्यांच्यावर अवलंबून असतानाही आपण आपले उद्योग आपल्या सेवा अधिकाधिक कार्यक्षम बनवणे आणि त्यांना जागतिक दर्जा मिळवून देणे म्हणजेसुद्धा आत्मनिर्भरता. या सगळ्यासाठी जमीन पाणी वीज मनुष्यबळ या सर्वच गोष्टींचा विचार करावा लागेल.