“आज माझ्याच सावलीला विचारलं मी,
का चालते तू माझ्यासोबत ?
सावलीने पण हसत उत्तर दिलं,
कोण आहे दुसरे तुझ्या सोबत ?”

 किती दिवस झाले ,कोणी माझ्याकडे ढुंकूनही पाहत नव्हतं. आज तुम्ही मला हातात घेतलं आणि माझा आनंद अनावर झाला खूप दिवसांपासून माझी इच्छा होती कोणीतरी याव, कोणीतरी माझी दशा बघावी आणि माझं मन त्यांच्यासमोर मोकळ कराव. नक्कीच तुम्हाला माझी दया आली म्हणून तुम्ही मला हातात घेतलं आणि मला स्वच्छ केलं.  माझी अशी दशा ज्यांनी केली त्यांना बहुतेक बुद्धीची जाणीव नसावी.  

 खरंतर मी जेव्हा जन्माला आलो तेव्हा पूर्ण पुस्तक नव्हतो.  मी सुद्धा तुम्हा माणसांसारखा अंशता वाढत गेलो. लेखकाने खूप विचार करून, कष्ट करून त्याचे विचार अक्षरांच्या रुपात काही कागदावर उतरवले.  त्यांच्या सुंदर लेखणीने मला सुंदर हस्ताक्षरात वळणे दिली.  मग एका प्रकाशकाकडे जाऊन त्यांनी विनंती केली.  त्यानंतर माझा खरा खरा जन्म झाला,  तो म्हणजे पुस्तक स्वरूपात.  खूप यातना सहन कराव्या लागल्या जन्म घेताना.  मीच काय ,माझ्या सर्वच मित्रांना खूप यातना सहन कराव्या लागतात . 

पण जेव्हा आम्ही एखाद्यापुस्तक प्रेमीच्या हातात पडतो, तेव्हा मात्र सार्थक झाल्यासारखे वाटते.  पुस्तक प्रेमी आम्हाला दुकानातून विकत घेतात.  कधी कधी तर आवडीच्या पुस्तकांसाठी शोध – शोध शोधतात आणि त्यांच्या हातात पडलो की ते दोन दिवसात फज्जा उडवतात . त्या दोन दिवसात पुस्तक सोडून त्यांना दुसरे काहीच आवडत नसते.  एकेक पान प्रेमाने उचलून एक- एक अक्षर निरखुन ते आम्हाला वाचतात. काही पुस्तक प्रेमी तर आम्हाला खाकी रंगाचा पोशाख सुद्धा चढवतात.  

 दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सरस्वतीचे प्रत्येक समजून आमची पूजा केली जाते.  सरस्वती ही विद्येची देवी.  पुस्तक वाचून तुम्हाला विद्या मिळते म्हणूनच पुस्तक म्हणजे आपल्या विद्येची एक गुंतवणूक आहे, जे आपल्याला व्याप सुद्धा देते.

   पुस्तकप्रेमी लोक आम्हाला खूप जपतात.  आमच्या अंगावर धुळीचा कण सुद्धा बसू देत नाही.  पण ज्यांना पुस्तकांमध्ये रस नाही, ते मात्र आमची किंमत कधीच समजू शकत नाही.  कितीतरी वेळा आमची पान फाटतात.  पण ते त्या पानांना फेकून देतात.  त्यांना काहीच फरक पडत नाही, असे केल्याने.  समजा जर माणसाच्या शरीराचा एखादा अवयव असा काढून टाकला तर ? तेव्हा, त्यांना किती यातना होत असतात…..  हे सगळ्यांनाच माहिती आहे.  मग आमच्या यातना आम्ही शब्दात सांगू शकत नाही ,म्हणून आम्हाला कसेही वागवले जाते.  

 पण, काही लोक खूप चांगले असतात.  पुस्तक वाचताना ते फक्त अक्षर वाचत नाही तर त्यातलाच एक भाग होऊन जातात.  मनाने एखाद्या पात्रात ते अखंड बुडालेले असतात आणि मग नवीन काही वाचायला घेतले तरी ते अगोदरच्या गोष्टीत गुंतलेले असतात.  पुस्तक वाचताना तुम्ही शरीराने तुमच्या खुर्चीत असता,  पण मनाने मात्र जगभर फिरून येता.  तुम्ही जितके जास्त वाचन कराल तितके जास्त ज्ञान तुम्हाला मिळते आणि तितकेच जास्त तुम्ही हुशार बनता.  “पुस्तकासारखा बोल पण बोल का दुसरा मित्र नाही”.