“हृदयाला हृदयासवें डोलावस वाटत,

विचार आणि भावनांना खुलवास वाटत,

खुलण्यासाठी हृदयाचा सुसंवाद होतो,

त्यातूनच तर भाषेचा जन्म होतो”

 अशीच हृदयाला हृदयाकडे नेणारी भाषा म्हणजे, माझी मराठी भाषा. मराठी भाषा दिवस अशाच समृद्ध मराठीचं अस्तित्त्व साजरा करतो. २७ फेब्रुवारी १९१२ हा दिवस श्रेष्ठ कवी, नाटककार व कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस “मराठी भाषा दिवस” म्हणून साजरा केला जातो.

आज काल मुंबई-पुण्यात बोलली जाणारी मराठी ,अनेक भाषांमधल्या शब्दांची सरमिसळ झालेली खिचडी. असं म्हणतात मैलामैलावर मराठी भाषा बदलत जाते. तिचा हेल, तिचे शब्द ,उच्चार बदलत जातात. ग्रामीण भागात शुद्ध मराठी बोलली जात नाही . पण तिचा गोडवा कायम राहतो. 

मराठी महाराष्ट्र प्रदेशात बोलली जाणारी भाषा असली तरी, त्यातल्या वेगवेगळ्या प्रातांमध्ये जिल्ह्यांमध्ये ती वेगवेगळ्या प्रकारे बोलली जाते. पश्चिम महाराष्ट्रात बोलली जाणारी घाटी, नागपुरात बोलली जाणारी वऱ्हाडी, खान्देशातली खान्देशी, गोव्यातली कोंकणी, मालवणातली मालवणी, कोकणातली कोकणी आणि किनारपट्टीवर आगरी -कोळी ,असे एक ना अनेक मराठी बोलण्याचे,मराठीचे वेगवेगळे चेहरे दिसतात.

जसे भारतातल्या अनेक भाषांचा जन्म संस्कृत मधून झाला. कोणतीही भाषा समृद्ध, संपन्न बनते ती त्यात असलेल्या साहित्य, कला आणि लिखाणामुळे ,अभिरुची संपन्न रसिकांमुळे. लघुकथा, ललित ,वाङ्मय, प्रवास वर्णन, कादंबरी, कविता, वैचारिक असे साहित्य प्रकार मराठी साहित्यात पाहायला मिळतात. त्यात अनेक लेखक तसेच कवींच्या उत्कृष्ट कलाकृती, रचना मराठीत आपल्याला उपलब्ध आहेत. मराठी भाषेला अनेक गुणवंत, प्रतिभावान साहित्यिक, लेखक, कवी, नाटककार, नट लाभलेले आहेत.

कवी केशवसुत, कुसुमाग्रज, कवी ग्रेस, बा. सी. मर्ढेकर, बालकवी, बहिणाबाई यांच्या कविता मराठी भाषेत खुलल्या. रणजित देसाई, विश्वास पाटील, विजय तेंडुलकर  यांच्या कादंबऱ्या व कथा आजही अख्ख्या जगाला भुरळ पाडत आहेत. पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, प्र. के. अत्रे  यांच्या लेखनाने मराठी विनोद खुमासदार झाला. विनायक दामोदर सावरकर यांचा लेखणीने मराठीला स्वत्त्व दिले. 

साहित्यासोबत आजच्या युगात सर्वात जास्त वापरले जाणारे किंवा मनोरंजनाचे साधन म्हणजे चित्रपट. मराठी चित्रपट आणि रंगभूमी हि अनेक मराठी साहित्य, कथा, कविता प्रभावीपणे सादर करण्यात यशस्वी झाली. दर्जेदार मराठी साहित्य, चित्रपट, रंगभूमी हे मराठी भाषेला समृद्ध , संपन्न बनवतात.

मराठी भाषा दिन साजरा करण्यासाठी अनेक निबंध स्पर्धा ,चर्चा सत्र आयोजित केले जातात , अनेक उपक्रम राबवले जातात. पण खरा मराठी भाषा दिन आपण ३६५ दिवस साजरा केला तरच आपण आपल्या मातृभाषेच्या जवळ राहू.

आज अँड्रॉइड स्मार्ट फोन च्या जमान्यात मराठीला फक्त टिकवून ठेवणे एवढेच आव्हान नाही, तर इतर भाषांमध्ये असलेल्या ज्ञानापासून स्वतःला वंचित न ठेवता मराठीचीहि कास न सोडणे, हे आहे. आपण जसा इतर भाषांचा आदर करतो, त्यामधून ज्ञान मिळवतो तसाच मराठीचा, आपल्या मातृभाषेचा आदर करायचा व त्यातून दैनंदिन संवाद करायचा.  मराठी पुस्तके, मराठी चित्रपट, मराठीतले लेख आवर्जून वाचायचे आणि सामायिक (share ) करायचे.

मराठी ही फक्त एक भाषा नाही तर एक वृत्ती आहे. अशी संपन्न मराठी भाषा जिच्यात सह्याद्रीचा कणखरपणा, मावळ्यांचा रांगडेपणा, गोदावरी कृष्णा कोयना ह्या नद्यांचा निर्मळपणा, ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, संत रामदास यांच्या भक्तीचा सुगंध आहे. शेवटी हे म्हणणंच सार्थ ठरेल.

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,

धर्म, पंत, जात एक मानतो मराठी,

एवढ्या जगात माय मानतो मराठी”.