धो धो पडणारा पाऊस जरा कमी झाला कि सुरु होते सणा – वारांची लांबच लांब रांग. पण या रांगेतला लहान मोठ्यांना सगळ्यांनाच आवडणारा सण म्हणजे आपला “गणेशोत्सव”. भाद्रपद महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला “गणेश चतुर्थी” म्हणून आपण साजरा करतो. लोकमान्य टिळकांनी घरा घरात साजरा होणाऱ्या गणेश चतुर्थीला सार्वजनिक करून गणेशेत्सोवाचे भव्य दिव्य स्वरूप दिले.

या सणाने उत्सवाचे स्वरूप धारण केले. यादिवशी गणेश चतुर्थीला आपण गणपती बाप्पाला आपल्या घरी किंवा मंडपात घेऊन येतो आणि त्याची पाच, सात किंवा अकरा दिवस मनोभावे पूजा करतो. गणपती बाप्पाचं स्वागत वाजत- गाजत ,ढोल ताशाच्या गजरात होते. फूले, फळे, दुर्वा, अनेक प्रकारच्या मिठाया, रांगोळी, तोरण एक ना अनेक प्रकार.. सारा आसमंत मंगलमूर्ती च्या आगमनाने मंगलमय, प्रसन्न होऊन जातो. बाप्पा आपल्या घरातलाच एक होऊन जातो.

हत्तीचे मुख असणारा गजानन, वाकडी सोंड असणारा वक्रतुंड, मोठे कान असणारा शूर्पकर्ण, एकच दात असणारा एकदंत, लांब पोट असणारा लंबोदर, सुमुख…सुखकर्ता ते मनोहर रूप आपल्या डोळ्यात साठवून ठेवायला ह्या गणपतीचे दर्शन घ्यायला रांगा लागतात. कुणी त्याच्यासाठी जास्वंदाचे फुलं अनंत कुणी मोदक तर कुणी त्याला हात जोडून नमस्कार करत. त्याचा एक हात नेहेमी भक्तांवर कृपा,आशीर्वाद देण्यासाठी वर असतो आणि दुसऱ्या हाती मोदक असतो.

बाप्पाची स्थापना होऊन आरती होते. सगळे नातेवाईक मित्र मंडळी आपल्या घरी किंवा सार्वजनिक मंडपात एकत्र येऊन आरती करतात. गणपती बाप्पाच्या निमित्ताने सर्व जण एकत्र येतात. अनेक पाहुणे मित्र मंडळी भेटी-गाठी होतात. या दिवसांमध्ये घराघरात मोदक बनवले जातात. व त्याचा नैवेद्य बाप्पाला दाखविला जातो. 

आपआपल्या कामामध्ये व्यस्त असलेला प्रत्येकजण वेळ काढून बाप्पाच्या आरतीसाठी घरी किंवा बाप्पाच्या मंडपात हजेरी लावतो. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक करण्यामागे सर्वांना एकत्र आणणे हे एक महत्वाचं कारण होत. जे, आज अनेक गणेशोत्सव मंडळ करतात अनेक स्पर्धा चित्रकला, गायन , वादन, वेशभूषा स्पर्धा नाटक आयोजित करतात. काही सामाजिक उपक्रम जसे, रक्तदान शिबीर हे गणेशोत्सव मंडळ दरवर्षी न चुकता राबवतात.

अशा अनेक कार्यक्रमात बाप्पाच्या रोजच्या आरती मध्ये दिवस कसे झरझर निघून जातात कळतही नाही आणि बाप्पाचा त्याच्या गावी जाण्याचा तो दिवस जवळ येतो. तो आता त्याच्या घरी जाणार म्हणून दुःख होत, पण पुढच्या वर्षी तो परतही येणार याचा आनंदही असतो. त्यामुळे आता स्पर्धा असते सगळ्यात मोठ्याने बोलण्याची….. “गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या