“वृक्ष-वल्ली आम्हा सोयरे वनचरे “……..
तुमच्याबरोबर मी हे फक्त हल्ली गाण्यातच ऐकतो. मी तुम्हाला सावली देतो, ऑक्सिजन ….. तुमचा प्राणवायू तुम्हाला देतो. पण तुम्ही काय करताय ? माझे अस्तित्व संपवून, तुम्हाला तुमची घर, कार्यालय ,मॉल्स, मनोरंजनाची वेगळी ठिकाणं बनवायची आहेत. माझ्याच लाकडाने त्यांना सजवायचं पण आहे. तुमच्या आधुनिक जगात तुम्ही फक्त तंत्रज्ञानाला महत्त्व देता. पण, तुमच्या प्रगती मध्ये तुम्ही माझे महत्त्व पुसून टाकताय. तुम्ही तुमच्यासाठी उंच घर बनवता, पण त्या घरात मोकळी, खेळती हवा येण्यासाठी तर माझीच गरज आहे ना ?
घर सुंदर आकर्षक दिसण्यासाठी मला कुंडीत आणून लावता. पण ,म्हणून मी तुम्हाला पाऊस देऊ शकत नाही. जमिनीत रुतलेली माझी मुळे तुम्हाला जमिनीचा कस वाढविण्यासाठी मदत करतात. कारण त्यात तुम्हाला लागणारा भाजीपाला अन्न-धान्य पिकत असते. मला कुंडीत आणून लावल्याने तुमचं कर्तव्य संपत नाही.
तुमच्या सुखासाठी सोयीसाठी तुम्ही वाहने बनवली, पण त्या वाहनांनी होणारे प्रदूषण हे माझ्यामुळेच कमी होईल, हे विसरू नका. माझ्या सावलीतच तुमची वाहने सुद्धा सुरक्षित राहतील, नाही का ? बरं, तुम्ही एवढी प्रगती केली ,मग एका जागेवरचे झाड कापून ते दुसऱ्या जागेवर जगवणं एवढा मात्र तुम्हाला अजून जमलं नाही. मेट्रो मधून तुम्हाला फिरायचं ,त्या मेट्रोसाठी कारशेड बनवायला सुद्धा तुम्हाला माझीच जागा मिळाली ?
तुम्ही माझ्या मोठ्या भावाला, म्हणजे वडाला ‘राष्ट्रीय वृक्षाचा’ दर्जा देता. पण जर तो तुमच्या प्रगतीच्या आड आला असं तुम्हाला वाटलं तर त्यालाही तुम्ही काढून टाकता. तिथे तुमची राष्ट्रभक्ती संपून जाते, असं नाही का वाटत तुम्हाला ?
“ झाडे लावा झाडे जगवा” हे फक्त बोलताना सगळे दिसतात. पण प्रत्यक्षात कृती करताना मात्र मोजकीच माणसे दिसतात. झाड लावण्याचे नाटक मात्र सगळेच करतात. ‘नाटक’ यासाठी म्हटलं ,कारण झाड लावताना त्याच्या बरोबर सेल्फी काढून ,सोशल मीडियावर फोटो टाकला की नंतर तुम्ही त्याच्याकडे वळून सुद्धा बघत नाहीत. स्वतःचे मात्र, काही वर्षांपूर्वीचे आणि काही वर्षानंतरचे वेगवेगळे फोटो तुम्ही काढता. मग, मला लावल्यानंतर किमान एका वर्षानंतर तरी तुम्ही माझ्याकडे या, आणि तसाच सेल्फी काढा. तिथे तुमची राष्ट्रभक्ती मी मानतो.
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावाला जाता, तेव्हा हॉटेलमध्ये जाऊन जेवण्यापेक्षा माझ्या सावलीत बसून जेवायला काहीजणांना खूप आवडते. पण आपली ही आवड भविष्यातही पूर्ण व्हावी, अशी इच्छा असेल तर……. “ एक तरी झाड जगवा हो, एक तरी झाड जगवा”