ह्या भूतलावर मानव हा, कमीत कमी पाच लाख वर्षांपासून राहत असावा, असा अंदाज व्यक्त केला जातो. सतराशे पन्नास नंतर लोकसंख्येची वाढ झपाट्याने होऊ लागली. ‘लोकसंख्या’ म्हणजे एखाद्या भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या.
प्रत्येक देश आपल्या ठराविक कालखंडानंतर गणना करतो. लोकसंख्या वाढीची वेगवेगळी कारणे आहेत. त्यातील सर्वात मुख्य कारण म्हणजे ,जन्म- मृत्यु दर. वाहतुकीच्या साधनांमध्ये सुधारणा झाल्यामुळे दुष्काळी भागांना मदत पोहोचवणे शक्य होऊ लागले. त्यामुळे मृत्यूची भीषण आपत्ती कमी झाली. परंतु , जन्मदर मात्र घटला नाही. ‘मुलगा’ हा वंशाचा दिवा असतो अशी लोकांची समजूत राहिल्याने मुलगा होईपर्यंत कुटुंब वाढत राहिली. लोकांना कुटुंबनियोजनाचे महत्त्व कळले नाही.
१९२० नंतर जगाच्या लोकसंख्या वाढीमध्ये खूप मोठा बदल दिसला. कारण विसाव्या शतकात औद्योगिक क्रांती झाली. नाना प्रकारचे शोध लागले, विविध प्रकारच्या रोगांवर उपचार आले आणि माणसाचा जीवन काळ वाढला. ‘निरक्षरता’ हेसुद्धा लोकसंख्या वाढीचे प्रमुख कारण आहे. निरक्षर राहिल्यामुळे अंधश्रद्धा वाढते.
“The increase in the world’s population
represents our victory against death.”
आणि वाढत्या लोकसंख्येमुळे आपल्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.
एवढ्या प्रचंड संखेच्या लोकांना मूलभूत सुविधा पुरविणे सरकारला अवघड जाते. आरोग्य, वैद्यकीय स्वच्छता ,अन्न व इतर अनेक सुविधा लोकांपर्यंत पोहोचण्यास वेळ लागतो. त्यामुळे भ्रष्टाचारही वाढतो. गावाकडे पुरेशा नोकऱ्या नसल्याने लोक शहराकडे वाटचाल करतात. हे स्थलांतरित लोक अपुऱ्या झोपड्यांमध्ये राहतात. त्यांना वैद्यकीय सुविधाच काय पण शिक्षण सुद्धा परवडत नाही. परिणामी अस्वच्छता वाढून रोगाचे प्रमाण वाढते. इमारती ,रस्ते बांधण्यासाठी झाडे तोडली जातात. त्यामुळे जमिनीची झीज होत नाही. पाणी जमिनीत मुरत नाही. अन्नधान्याचा तुटवडा,अपुरा निवारा, स्थलांतर,ऊर्जेची कमतरता भासणे, गुन्हेगारीचे वाढते प्रमाण, अशा विविध दुष्परिणामांना सामोरे जावे लागते.
लोकसंख्येचे नियंत्रण करण्यासाठी परिणामकारक उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. या साठी सर्वात आधी ‘जन्मदर’ नियंत्रित करणे गरजेचे आहे. लग्नासाठी किमान वयाची मर्यादा वाढवली पाहिजे. स्त्रीयांचे जीवनमान सुधारले पाहिजे. स्त्रियांना सामाजिक व आर्थिक स्तरांवर सुधारण्याची संधी दिली पाहिजे. शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे, जेणेकरून लोकांचे विचार सुधारतील. स्त्रियांना मुलं न झाल्यास त्यांच्यावर वैद्यकीय उपचाराचे बंधन केले जाते ,अशा वेळी त्यांना मूल दत्तक घेण्याचा मार्ग मोकळा करावा. सर्वांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी कृषी आणि उद्योग या दोघांमध्ये ही सुधारणा उपलब्ध करून दिल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. कुटुंब नियोजनासाठी सरकारकडून वेगवेगळे उपक्रम राबवले गेले पाहिजेत.
प्रगत राष्ट्रांची लोकसंख्या फारच कमी आहे व निसर्गाने त्यांना प्रचंड साधनसंपत्ती उपलब्ध करून दिली आहे. याउलट विकसनशील राष्ट्रांची लोकसंख्या भरमसाट आहे पण त्यामुळे त्यांना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते .
“लोकसंख्या ठेवा नियंत्रित
गरजा भागतील सुरळीत”