‘गाय ’ माझा आवडता पाळीव प्राणी आहे. आमच्या घरी शेतात आमची गाय आहे. आम्ही शेतातच राहतो. आमच्या गायीचे नाव ‘लक्ष्मी ’ आहे. तिला  छोटस वासरू आहे. त्याला आम्ही ‘छोटी लक्ष्मी’ असे म्हणतो. लक्ष्मी खूप हुशार आहे. आमच्या घरातील कोणीही तिला लांबून जरी दिसले, तरी ती आम्हाला आवाज देते. हंबरते म्हणजे आमच्याशी संवाद साधते. आम्हीही सर्वजण कितीही घाई असली तरी तिला भेटल्याशिवाय, तिच्या अंगावरून हात फिरवल्याशिवाय बाहेर जात नाही. आमची गाय सकाळ-संध्याकाळ दोन्हीही वेळेला दूध देते. आम्ही गाईला चार, ढेप ,उसळ  अशाप्रकारे तिचे आवडीचे खाद्य तिला खाऊ घालतो.  

लक्ष्मी तपकिरी रंगाची आहे. तिचे डोळे मोठे टपोरे आहेत. कान तर मस्त सस्याच्या कानासारखे आहेत. तिची  शिंगे गोलाकार आहेत. जणूकाही ती एकमेकांना भेटायला निघाली आहेत असे वाटते. शेपटी तर लांबसडक आहे. शेपटीचे केस खूपच मऊ व चमकदार आहेत.

तिच्या दूधाला खूपच मागणी असते. कारण लहान बाळांसाठी गायीचे दूध खूपच पौष्टीक असते. गोमूत्रालाही खासकरून आयुर्वेदिक औषधांसाठी विशेष मागणी असते.  गायीच्या शेणाचा शेणखत, गोवऱ्या, धुपबत्ती, अगरबत्ती अशा विविधप्रकारे उपयोग होतो. आमच्या शेतात गोबरगॅसही आहे.

 गाय ज्यावेळी चारा खाते त्यावेळी जास्त न चावताच खाते व आपले पोट भरते. जेव्हा ती आरामात खाली बसते तेव्हा ती तेच पोटातल खाणे तोंडात काढून रवंथ करते.

आमची गाय नावाप्रमाणेच लक्ष्मी आहे. तिची  सकाळी व संध्याकाळी पूजा केली जाते. असे म्हणतात की, गायीच्या पोटात तेहतीसकोटी देव वास करतात. दिवाळीच्या वेळी वसुबारसच्या दिवशीतर गायीचा गोठा छान स्वच्छ करून सजवला जातो आणि गायीलाही छान आंघोळ घालून, नवीन कपडे घालून सजवले जाते. अशाप्रकारे आमची गाय मला खूप आवडते.