“विद्याधन दे आम्हांस, एक छंद एक ध्यास
नाव नेई पैलतीरी दयासागरा”

विद्याधन देणारी म्हणजे शाळा. ह्या प्रार्थनेसोबत, प्रतिज्ञा आणि राष्ट्रगीताने शाळेची सुरुवात होते. दिवसाची सुरुवात एक विद्यार्थी प्रतिनिधी सर्वांना विशेष अशी काही बातमी सांगून करतो. जेणेकरून विद्यार्थ्यांना आजूबाजूला चाललेल्या घडामोडींबद्दल जाणून घेण्याची सवय लागते. अतिशय शिस्तीत रांग करून आम्ही वर्गात जातो.

   माझी शाळा डी. ए. व्ही. पब्लिक स्कुल ही एक आदर्श शाळा आहे. शाळेची पाच मजली इमारत भव्य व आकर्षक आहे. इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण इथे मिळते. सुमारे पाच हजार विद्यार्थी येथे दोन सत्रांमध्ये शिक्षण घेतात.

मुलांना घडविण्यात आई–वडिलांचा जेवढा वाटा असतो तेवढाच शाळेचाही असतो. आमच्या शिक्षिका भावे मॅडम खूप छान गणित समजावून देतात. आमच्या वर्गाला ल.सा. वि. समजावून देण्यासाठी त्यांनी एक विशेष तास घेतला. आमच्या सर्व शंका मिटेपर्यंत त्या शिकवत होत्या.

वादविवाद, निबंध लेखन, संस्कृत श्लोक, नाटक आणि चित्रकला सारख्या स्पर्धेत भाग घ्यायला शिक्षक आम्हाला प्रोत्साहित करतात.

शाळेचा परिसर स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न आहे. प्रत्येक वर्गात वर्गातील विद्यार्थ्यांनीच बनवलेले पाढे, व्याकरणाचे धडे, चित्रे आहेत. शाळेच्या मैदानामध्ये आम्ही विविध खेळ जसे फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल, कबड्डी, खोखो खेळतो. आमच्या शाळेचे विविध संघ या खेळांमध्ये राज्य, राष्ट्रस्तरीय जाऊन आल्या आहेत.

शाळेतला माझा आवडता भाग म्हणजे ग्रंथालय तिथे सर्व प्रकारची पुस्तके आहेत. रिकामा तास मिळाला की विद्यार्थी ग्रंथालयाकडे धाव घेतात. मला ईंटरनेट या विषयाची अनेक पुस्तके इथे मिळाली ज्यामुळे माझी त्या विषयामधली गोडी वाढली.

शाळेच्या प्रयोग शाळेत केलेले प्रयोग आम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची खोली समजायला मदत करतात, शास्त्रीय दृष्टीकोन विकसित करतात. 

स्वतंत्र दिवस, गणतंत्र दिवस, वार्षिक स्नेहसंमेल्लन, सहल यामध्ये आम्ही मित्र-मैत्रिणी मिळून सहभाग घेतो. शाळेतले वेगवेगळे उपक्रम, मित्र-मैत्रिणी यामुळे शाळेत कुणालाच कंटाळवाणे वाटत नाही, उलट एकही दिवस शाळा चुकवण्याचा कंटाळा येतो.

        शाळा केवळ शिक्षणाचे केंद्र नसून ते एक मंदिर आहे. जिथे आम्ही आदर्श नागरिक घडवले घडतो. शाळेविषयी कृतज्ञता याप्रकारेच व्यक्त करू शकतो

“होऊ आम्ही नीतिमंत, कला गुणी बुद्धीमंत
कीर्तिचा कळस जाय उंच अंबरा ”