महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर या गावी झाला. त्यांचे बालपण शांततेत आणि धार्मिक वातावरणात गेले. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी होते, जे पोरबंदरच्या दीवाणपदी होते, तर आई पुतळाबाई साधी व धार्मिक वृत्तीची महिला होती. लहानपणापासूनच गांधीजींवर त्यांच्या आईच्या धार्मिकतेचा आणि प्रामाणिकपणाचा मोठा प्रभाव पडला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते.

गांधीजींनी जगाला अहिंसा व सत्याग्रह हे दोन महत्त्वपूर्ण विचार दिले. उदाहरणार्थ, दांडी सत्याग्रहाच्या वेळी त्यांनी मिठाच्या कायद्याचा अहिंसेच्या माध्यमातून विरोध केला, ज्यामुळे ब्रिटीश सत्तेला मोठे आव्हान दिले गेले. सत्याग्रहाच्या तत्त्वाने अन्यायाविरुद्ध शांततामय मार्गाने लढण्याचा आदर्श त्यांनी उभा केला, ज्याचा प्रभाव जगभरातील अनेक नेत्यांवर झाला.

गांधीजी शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये गेले आणि तेथे बॅरिस्टर झाले .परंतू त्यांचा संघर्ष भारतात नव्हे तर दक्षिण आफ्रिकेत सुरु झाला . १८९३ मध्ये ,ते एका खटल्यासाठी दक्षिण आफ्रिकेत गेले आणि तिथे त्यांनी वर्णद्वेष आणि भारतीयांवर होणारे अन्याय पहिले. एक प्रसंग त्यांचा जीवनक्रम बदलणारा ठरला, पिटरमयरिट्सबर्ग रेल्वे स्थानकावर गोऱ्या प्रवाशांच्या तक्रारीवरून त्यांना पहिल्या वर्गाच्या डब्यातून बाहेर फेकण्यात आले. त्या अपमानाने त्यांना अन्यायाविरोधात शांततेने लढण्याची प्रेरणा मिळाली आणि सत्यासाठीचा आग्रह संकल्पना त्यांना सुचली.

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गांधीजींनी तीन प्रमुख चळवळी सुरु केल्या – असहकार आंदोलन (१९२०), दांडी सत्याग्रह (१९३०), आणि भारत छोडो आंदोलन (१९४२). यामध्ये दांडी सत्याग्रह हा एक अविस्मरणीय प्रसंग ठरला.      

गांधीजींच्या हे लक्षात आले कि गरिबांना पुरेसे कपडे नाहीत, तेव्हा त्यांनी साधे वस्त्र परिधान करण्याचा निर्णय घेतला आणि फक्त पंचा वापरण्यास सुरुवात केली. त्यांच्या जीवनातील निर्धार “करेंगे या मरेंगे” हा होता. त्यांनी शस्त्रांशिवाय लढण्याचे महत्त्व लोकांना पटवून दिले. त्यामुळेच लोक त्यांना आपलेसे मानू लागले आणि त्यांना “महात्मा” ही उपाधी दिली.

गांधीजींच्या नेतृत्वाने अनेक आंदोलने यशस्वी झाली. दांडी सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यांनी मिठाच्या कायद्याचा अहिंसेच्या मार्गाने विरोध केला, त्यामुळे ब्रिटिश सत्तेला हादरा बसला. भारत छोडो आंदोलनाद्वारे त्यांनी देशवासीयांना स्वातंत्र्यासाठी एकत्र आणले. त्यांनी परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराचा संदेश दिला, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली.लोकांना रोजगार मिळाला. 

महात्मा गांधींचे साधे जीवन, उच्च विचार आणि लोकहिताची तळमळ यामुळे ते केवळ भारताचेच नव्हे तर जगाच्या इतिहासातील एक महान व्यक्तिमत्त्व ठरले.

एकदा एका आईने आपल्या मुलाला खूप गोड खाण्याची सवय होती म्हणून गांधीजींकडे मदतीसाठी नेले. गांधीजींनी त्या मुलाला लगेच सल्ला न देता दोन आठवड्यांनी येण्यास सांगितले. दोन आठवड्यांनंतर, त्यांनी त्या मुलाला गोड खाणे सोडण्यासाठी सांगितले. आईने आश्चर्याने विचारले कि, हे दोन आठवडे का थांबलात? गांधीजी म्हणाले,”मलाही गोड खाण्याची सवय होती. मी ती आधी सोडली, मगच सल्ला दिला. हा प्रसंग त्यांच्या प्रामाणिकतेचा आणि आत्मशिस्तीचा सर्वोत्तम दाखला आहे.                                                      

महात्मा गांधींचे साधे जीवन, उच्च विचार आणि लोकहिताची तळमळ यामुळे ते केवळ भारताचेच नव्हे तर जगाच्या इतिहासातील एक महान व्यक्तिमत्त्व ठरले. त्यांच्या विचारांमुळे आणि कार्यांमुळे संपूर्ण जगाला अहिंसा आणि सत्याचा मार्ग कळला. त्यामुळेच ते भारतीयांच्या हृदयात “बापू” म्हणून अमर झाले आहेत.