प्र १. कृती पूर्ण करा.

अ)        ‘रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळे आयुष्याचे दिवस वाया गेलेत’ या आशयाची कवितेतील ओळ शोधा.
उत्तर:    “भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली.”

आ)       कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद दाखवणारी ओळ लिहा.
उत्तर:    दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

प्र २. एका शब्दांत उत्तर लिहा.

अ)        कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट
उत्तर:    हात

आ)       कवीचा जवळचा मित्र
उत्तर:    अश्रू

प्र ३.  खालील शब्दसमूहांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा.

अ)        माना उंचावलेले हात
उत्तर:    आशावादाने उभारलेले हात

आ)       कलम केलेले हात
उत्तर:    निराश, शक्तिहीन झालेले हात

इ)         दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात
उत्तर:    कष्टाळू, सतत काम करणारे हात

प्र ४.  काव्यसौंदर्य

अ)        खालील ओळींचे रसग्रहण करा.

‘दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दुःखात गेले 

हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे’

उत्तर:    ‘कविवर्य नारायण सुर्वे’ ह्यांच्या ‘दोन दिवस ‘ या कवितेत कवीने स्वतःच्या जीवनाचे सत्य मांडले आहे. पण जगाच्या शाळेत दुःख पचवून जगण्याची शिकवण त्यांना कशी मिळाली ह्याचे सुद्धा वर्णन आहे. दोन दिवस सुखाची वाट पाहण्यात गेले, तर दोन दिवस हे दुःखात गेले. त्यामुळे कवी आता आयुष्याचे किती दिवस उरले आहेत याचा हिशोब मांडत आहे. अजून किती दिवस सहन करण्यात जाणार आहेत याचा विचार कवी करत आहे. अनेक वेळा चंद्र उगवला व तारे आकाशात चमकले पण लेखकाचे दिवस मात्र भाकरीचा चंद्र शोधण्यात म्हणजेच कष्ट करून भाकरी मिळवण्यातच गेली.

आ)       ‘दुःख पेलावे आणि पुन्हा जगावे’, वाक्यामधील तुम्हाला जाणवलेले विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

उत्तर:    ‘कविवर्य नारायण सुर्वे’ ह्यांच्या ‘दोन दिवस ‘ या कवितेतून ‘दोन दिवास वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले’ असे जीवनाचे वास्तव चित्र रेखाटताना ‘भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली’ असे भीषण जीवनसत्य कवीने मांडले आहे; पण हे सत्य मांडताना जगाच्या या शाळेत दु:ख पचवून जगण्याची शिकवण आपल्याला मिळाल्याचे ते सूचित करतात. कवी म्हणतात, भाकरीचा चंद्र शोधताना म्हणजे कष्ट करून भाकरी मिळवताना त्यांनी संपूर्ण जगाचा विचार केला. संपूर्ण जगाचा विचार करताना दुःख कसे झेलले पाहिजे, दुःख झेलून पुन्हा कसे जगले पाहिजे ते या दुनियेच्या शाळेने त्यांना शिकवले.

इ)         कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा.

उत्तर:    कवी नारायण सुर्वे यांनी ‘दोन दिवस’ या कवितेत कष्टकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. कष्ट करणाऱ्यांसाठी भाकरीच चंद्र असते. सुखी माणसांच्या जीवनात ज्याप्रमाणे चंद्र, तारे असतात, त्यांच्या अनेक रात्री सुखात जातात, अगदी त्या विरुद्ध कष्ट करणाऱ्यांसाठी भाकरी हाच चंद्र असतो आणि ती मिळवण्यासाठीच त्यांची अखंड धडपड चालू असते. त्यात दिवस कसे निघून जातात ते समजतही नाही. त्यांचे हात हेच त्यांचे सर्वस्व असते. आणि ते अविरत चालू असतात. भाकरी मिळवण्यासाठी त्यात दुनियेची शाळा त्यांना दुःख पचवून कसे पुन्हा नव्याने जगायचे ते शिकवते.

ई)         ‘कवितेत व्यक्त झालेले जीवनसत्य’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.

उत्तर:    कवी नारायण सुर्वे यांच्या ‘दोन दिवस’ या कवितेत कष्टकरणाऱ्यांचे जीवन वर्णन केले आहे. कोणताही दिवस आला, चंद्र आला, तारे आले, उन्हाळे-पावसाळे, धुंद रात्री आल्या तरी, कष्ट करण्यापलीकडे त्यांच्या जीवनात काहीच नसते. त्यांचे हात हेच त्यांच्यासाठी सर्वकाही असते. दोन दिवस त्यांचे वाट बघण्यात जातात आणि दोन दिवस दुःखात जातात. हाच क्रम त्यांच्या आयुष्यात चालू असतो. दारिद्र्य हे त्यांच्या नशिबीच असते. कधी हात स्वाभिमानाने उंचावलेले तर कधी परिस्थितीला शरण गेलेले असतात. अशा वेळी फक्त अश्रूंची त्यांना साथ असते. दुनियेचा विचार ते नेहेमी करतात पण, दुनियेची शाळा त्यांना दुःख झेलून पुन्हा कसे उभे राहावे हे पुन्हा पुन्हा शिकवते.