आज मानवाने विज्ञानाच्या मदतीने प्रचंड प्रगती केली आहे. आकाशाला गवसणी घालणाऱ्या यंत्रणा, महासागराच्या तळाशी पोहोचणारी वाहने आणि संगणकाच्या साहाय्याने विश्वावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
मानवाने आपल्या उन्नतीसाठी जंगल तोड करून अनेक नैसर्गिक रचना बदलल्या आहेत. जसे नद्यांमधून वाळू उपसणे, दलदल बुजवून तिथे उंच इमारती उभ्या करणे, डोंगर फोडून तिथे रास्ते बनवणे यामुळे वातावरणात असंतुलन निर्माण झाले आहे. या असंतुलनामुळे “ग्लोबल वॉर्मिंग” म्हणजेच जागतिक तापमानवाढ झाली आहे.
जागतिक तापमानवाढीमुळे हवामानातील अनियमितता वाढली आहे. पावसाचे प्रमाण आणि वेळ बदलल्यामुळे अनेक ठिकाणी अतिवृष्टी होते. अशा अतिवृष्टीमुळे नद्या दुथडी भरून वाहू लागतात आणि महापूरासारखी संकटे निर्माण होतात.
महापुरामुळे जीवितहानी होते. अनेक लोकांचे प्राण जातात, अनेक बेघर होतात. शेतकरी, मजूर, सामान्य माणूस यांना याचा फार मोठा फटका बसतो. घरं, शेती, पाळीव जनावरं, उद्योगधंदे सर्व नष्ट होतातच शिवाय वित्तहानी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होते.
महापुराच्या संकटापासून वाचण्यासाठी आपल्याला निसर्गाच्या संतुलनाची जाणीव ठेवावी लागेल. झाडे लावणे, प्रदूषण कमी करणे, पाण्याचा अपव्यय थांबवणे, तसेच सरकारने योग्य जलव्यवस्थापन करणे, धरणांची निगा राखणे आणि तातडीच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी योजना तयार करणे आवश्यक आहे.
सरकार बरोबर सामान्य नागरिकांचे सुद्धा कर्तव्य आहे की आपल्या परिसराची योग्य प्रकारे काळजी घेणे, प्रदूषण टाळणे, प्लास्टिकचा उपयोग कमीत कमी करणे. या गोष्टी आपण नक्कीच करू शकतो.
महापूर हे जरी नैसर्गिक संकट असले तरी विज्ञान, सरकार आणि जनसामान्य यांनी एकत्र येऊन काम केल्यास आपण नक्कीच त्यावर मात करू शकतो.