मी एक सामान्य शेतकरी आहे. माझे आयुष्य मातीशी जोडलेले आहे. पहाटे कोंबड्यांच्या आरवण्याबरोबरच माझा दिवस सुरु होतो. शेतात राबणे, नांगरणे, बी पेरणे, पाण्याची व्यवस्था करणे, तण काढणे हे सगळे मी आणि माझी पत्नी मिळून करतो. तिची साथ मला नेहमीच बळ देते.

            माझं संपूर्ण जीवन निसर्गावर अवलंबून आहे. कधी पावसाने साथ दिली तर पीक चांगले येते, पण अनेक वेळा निसर्गाचा अनियमितपणा मला हताश करतो. अवेळी पावसामुळे किंवा दुष्काळामुळे पिकांचे मोठे नुकसान होते. काही वेळा गारपीट, काही वेळा वादळ — कधी कोणती आपत्ती येईल हे सांगता येत नाही. हल्ली होणारे हवामानातले बदल खूप त्रेधा तिरपिट उडवतात.

            निसर्गातील उलथापालथ, अनेक सरकारी नियम यांमधून पीक आलेच तरी, पीक घेतल्यावर बाजारात योग्य मोबदला मिळेल की नाही याची खात्री नसते. व्यापार्‍याने माल विकला तरी आमच्या हातात कधी कधी फारच कमी दर मिळतो. कित्येकवेळा तर आम्ही आमचे धान्य साठवून ठेवलेले असते पण, अवकळी पाऊस आला की त्याचे सुद्धा नुकसान होते. त्यामुळे अनेक वेळा कर्ज फेडणेही कठीण होते. नागंरणी, पेरणी, छाटणी हे सर्व जरी योग्य वेळेप्रमाणे जुळून आले तरी बाजारभाव नाही मिळाला म्हणून भाज्या रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आमच्यावर येते. 

            माझ्यावर वृद्ध आई-वडील, पत्नी, मुलांचे शिक्षण आणि घरखर्च याची मोठी जबाबदारी असते. इतक्या कष्टांनंतरही जीवन खूप कठीण असते. कधी कधी निराशा वाटते, पण तरीही मी आशा सोडत नाही. कारण माझ्या कष्टातूनच देशाला अन्नधान्य मिळते.

            शेतकरी हा या देशाचा कणा आहे पण, आज गावातील तरुण शिक्षण घेऊन शहराकडे धाव घेत आहेत, त्यामुळे गावे ओस पडत आहेत. जर सरकारने योग्य धोरणे राबवली आणि शेतकऱ्यांना योग्य मदत केली, तर आमचे जीवन अधिक सुखकर होईल. नवीन तत्रंज्ञान, खते यांची योग्य माहिती योग्य वेळी मिळाली तर शेतकऱ्यासोबत देश सुद्धा अधिक समृद्ध होईल व शेतीकडे तरुण वळतील.