अरे! तू मला रोज शाळेतून आलास की जोरात फेकून देतो. किती त्रास होतो मला. मी शाळेत उपयोगात येणारी सगळ्यात महत्वाची वस्तू. महत्वाची वस्तू यासाठी की माझ्याशिवाय तुम्ही शाळेत जाऊच शकत नाही. मी नसेल तर तुमची वह्या, पुस्तके, कंपास बॉक्स, डबे, पाण्याची बाटली हे सर्व तुम्ही शाळेत नेणार कसे?

शाळा सुरु झाली की माझी आठवण येते. वह्या पुस्तके नेणारे दप्तर नीट आहे का? नसेल तर त्याला डागडुजी करून नीट केले जाते. अगदीच नीट नसेल तर नवीन घेण्यासाठी बाजाराकडे धाव घेतली जाते. मी हव्या त्या रंगात आकारात उपलब्ध असतो. लाल, निळा मुलांसाठी. गुलाबी पिवळा मुलींसाठी.. तुम्हाला हवा तो रंग….आणि आकार सुद्धा. छोटा, मोठा, मध्यम..

शाळेच्या सुरुवातीला माझी खूप काळजी घेतली जाते. पण जसजसा मी जुना होता जातो तसतसे माझ्याकडे लक्ष देणं कमी होतं. कधी पावसात भिजतो, कधी माझ्या आत पाण्याची बाटली वाकडी होते. कधी डब्यातले खाद्यपदार्थ आत सांडतात. मला डाग लागतात. काही मुले माझी खूप काळजी घेतात, पण काहीजण खूपच हलगर्जी असतात. ते मला नीट सांभाळत नाहीत. त्यामुळे फक्त मलाच त्रास होत नाही तर माझ्या आत जी त्यांची वह्या पुस्तके असतात त्यांचं आयुष्य कमी होत असतं.

मुले माझातूनच उत्तरपत्रिकेत मिळालेले गुण घेऊन घरी जातात. कधी ते आनंदात असतात तर कधी उदास.  मित्रांनी दिलेल्या अनेक गोष्टी शुभेच्छा पत्रे, रंग, ब्रश, हे सुद्धा माझ्यात ठेवतात. कधी धातूच्या फूटपट्टीने तर कधी पेन्सिल अथवा पेनने मला छिद्र पाडतात. तेव्हाही मला खूप वेदना होतात. पण खरी वेदना मला तेव्हा होते जेव्हा मुलं घरी आल्यावर मला इकडे तिकडे कुठेही भिरकावून निघून जातात. मला काळजीपूर्वक ठेवत नाहीत. माझा नीट वापर झाला तर मलाही आनंद होईल आणि मी जास्त दिवस तुमच्यासोबत राहू शकेन.