आदर्श विद्यालय – शिक्षक दिन (SSC Revised २०२३)

५ सप्टेंबर : कोल्हापूर, आदर्श विद्यालय येथे ‘शिक्षक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला. ५ सप्टेंबर शिक्षक दिन म्हणजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७.३० वाजता झाली. आदर्श विद्यालयाचे प्राचार्य मा. श्रीनिवास सदावर्ते यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला हार घालून व दीप पेटवून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाला शाळेचे सर्व आजी माजी शिक्षक हजर होते.  प्राचार्यांनी आपल्या भाषणात शिक्षक दिनाचे महत्व पटवून दिले. “शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जीवनातला दीपस्तंभ आहे” असे ते म्हणाले. ज्येष्ठ शिक्षिका मधुरा भांडारकर यांनी, “शाळा हे आम्हा शिक्षकांसाठी फक्त काम करण्याचे ठिकाण नाही, तर एक मंदिरच आहे”, असे गौरव उद्गार काढले. त्या पुढे असेही म्हंटल्या कि, “शाळेत आम्ही फक्त शिकवत नाही तर अशी व्यवस्था बनवतो ज्यात प्रत्येक जण एक माणूस म्हणून घडत असतो. आणि शिक्षक सुद्धा आजन्म घडतच असतो. तुम्ही विद्यार्थी आम्हाला खूप काही शिकवता.” प्रत्येक शिक्षकांना पुष्पगुच्छ व विद्यार्थ्यांनी बनवलेले शुभेच्छा पत्र देऊन सन्मान करण्यात आला.

त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आपले शिक्षक दिनाबद्दलचे विचार मांडले. शिक्षकांकरता करमणूक म्हणून ६ वी ‘ब’ च्या विद्यार्थ्यांनी एक छोटेसे नाटक सादर केले. ज्यात शिक्षक विद्यार्थ्यांचे जीवन कसे घडवतात, हे सुंदररित्या दाखवले. विद्यार्थ्यांनी करमणुकीचे कार्यक्रमसुद्धा करून दाखवले. त्यात नृत्य व मराठी गीतांचा विशेष कार्यक्रम होता. शिक्षकांच्या भूमिकेत एक दिवस शिरता यावे म्हणून काही विद्यार्थ्यांनी गणित, मराठी, इंग्रजी या विषयाचे तास वर्गांमध्ये घेतले. या तासामध्ये त्यांनी या विषयातला धडा किंवा एखादी संकल्पना विद्यार्थ्यांसमोर यथाशक्ती शिकवली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांकरिता प्रशमंजुषा तयार केली होती. त्यात शिक्षकांचे गट बनवून विद्यार्थ्यांनी ती प्रशमंजुषा घेतली. शिक्षक व विद्यार्थी दोघांनीही याचा आस्वाद घेतला. कार्यक्रमानंतर सर्वांनी स्नेहभोजन सुद्धा केले.