अभिनव विज्ञान प्रदर्शन (SSC २०२२)
नागपूर १५ ऑक्टोबर रोजी अभिनव विद्यालय,येथे “अभिनव विज्ञान प्रदर्शन” पार पडले. प्रदर्शनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ विज्ञान अभ्यासक डॉ. सुहास माने यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण क्षेत्रातले श्री. आशिष वाघ होते. प्रदर्शनाचे उदघाटन श्री. आशिष वाघ यांनी केले. हे प्रदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांनी घडवलेले एक उत्तम उदाहरण आहे, असे आशिष वाघ यांनी सांगितले. प्रदर्शनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांतील विज्ञानाविषयीची उत्सुकुता, प्रेम आणि ओढ वाढेल अशी अशा त्यांनी व्यक्त केली. तसेच असे उपक्रमांचे आयोजन होत राहिले पाहिजे, जेणेकरून नवनवीन विषय, कौशल्य, संकल्पना पुढे येतील, असेही ते म्हणाले.
डॉ. सुहास माने आणि श्री. आशिष वाघ या दोघांनी स्वतः संपूर्ण प्रदर्शन फिरून प्रत्येक विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यातील उत्कृष्ट प्रकल्पांना पुरस्कार जाहीर करण्यात आले. या प्रदर्शनात ५० शाळांनी सहभाग घेतला होता. १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात सहभाग होता. भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, पर्यावरणशास्त्र असे अनेक विभाग प्रकल्पांचे होते. या प्रदर्शनात वाणी विद्यालय, नागपूर ह्या शाळेने कचरा व्यवस्थापन यावर एक उत्तम प्रकल्प बनवला होता. त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले. उत्कर्ष विद्यालयाच्या सौरऊर्जा प्रकल्पाने दुसरे पारितोषिक पटकावले.
विज्ञानावर एक छोटीशी नाटिका सुद्धा विद्यार्थ्यांनी सादर केली. विद्यार्थ्यांनी अनेक प्रकल्प बनवले होते व ते प्रकल्प कोणत्या तंत्रावर चालतात याचे सुंदर स्पष्टीकरण ते येणाऱ्या प्रत्येकाला देत होते. अशी प्रदर्शने नक्कीच मुलांमध्ये विज्ञानाबद्दल आवड निर्माण करतील व अनेक भावी वैज्ञानिक यातून घडतील. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या अथक प्रयत्नांनी हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी करून दाखवले. अभिनव विद्यालयाने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करून एक स्तुत्य उपक्रम पार पाडला.