पाऊस आला की माझी सर्वांना आठवण येते आणि गरज भासते, पाऊस नसला तरी गरज भासतेच. पण पाऊस आल्यावर माणसाला सर्वात जास्त भीती कशाची वाटते माहिती आहे?? पावसात भिजण्याची नाही, तर मला कुठेतरी विसरण्याची… मला सतत सोबत ठेवण्याची ओढ पाऊस घेऊन येतो…ओळखा बरं…कोण मी??

होय, मी छत्री…पावसाची चाहूल लागली की मला शोधण्याची लगबग सुरु होते. मी कपाटातून बाहेर येते किंवा मला बाजारातून नवीन खरेदी करून आणले जाते. वळलेल्या मुठीची, सरळ मुठीची, छोटी, मोठी, काळी, रंगीत, एक-दोन किंवा तीनदा दुमडणारी, रंग बदलणारी किंवा मला हव्या त्या रंगाने, कलेने सजवण्यासाठी सफेदही… आणि आता तर इलेक्ट्रॉनिकसुद्धा!

काही वात्रट, खोडकर मुले माझा उपयोग अस्त्रासारखा किंवा एकमेकांसोबत खेळण्यासाठी करतात. आजोबा तर मला स्वत:चा आधार म्हणून सांभाळतात. पायऱ्या उतरताना किंवा चढताना किंवा अगदी सरळ चालताना सुद्धा माझा काठी सारखा उपयोग करतात. माझ्यावर थोडा भार पडतो पण आजोबांना आधार मिळतो.

कडक उन्हात तर मला खूप त्रास होतो. पण, माझ्या मालकाला माझ्यामुळे ऊनापासून संरक्षण मिळते त्यामुळे मला खूप समाधान मिळते.  

प्रत्येकाला मला विसरण्याची किंवा हरवण्याची भीती वाटावी ही माझ्यासाठी अभिमान बाळगण्यासारखी गोष्ट आहे. अनेक आनंदाच्या क्षणांचा मी साक्षीदार असते. तसे जोराच्या वाऱ्यासामोर माझा निभाव लागत नाही पण, तरीही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मला पुन्हा हातात घेताच. कित्येकांना जवळ आणण्याचे काम मी करते. काहीजण असेही असतात जे मला वर्षोनुवर्षे जपतात, सांभाळतात. पण सगळेच मला जपतात असे नाही. काहीजण माझा उपयोग करून मी तुटले की फेकून देतात.

पाऊस नसल्यावर मात्र मी कित्येकांना नकोशी होते, जड होते. अडगळीच्या जागी मी गप्प बसून राहते आणि पुन्हा पाऊस येण्याची वाट पाहत राहते…….