“बोलावं विठ्ठल ,पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव”……..
मी दहा वर्षांचा होतो तेव्हा आई आम्हाला सोडून पंढरपूर यात्रेला गेली होती. आमची शाळा, बाबांचे ऑफिस, सगळे चालू असताना आमच्या आजीकडे आम्हाला सोडून गेली. खूप पाऊस पडत होता त्यामुळे बाबा तिला सारखे म्हणत होते की तू जाऊ नकोस आजारी पडशील . तरीसुद्धा आई हट्ट करून पंढरपूरला गेली. आमच्या काही नातेवाईकांचे म्हणणे होते की आईने अशा सगळ्या जबाबदाऱ्या सोडून जाऊ नये. देव फक्त देवळातच असतो का ? थोरामोठ्यांची सेवा करणे लहानांची काळजी घेणे आणि सर्वांचा सन्मान करणे यातच ईश्वरभक्ती आहे.
हजारो लोक आपापली कामे सोडुन दहा-बारा तास देवाच्या दर्शनासाठी रांगेत उभे असतात. काही लालबागच्या राजासाठी , काही कोल्हापूरच्या देवी साठी , काही शिर्डीच्या साईबाबांसाठी , काही पंढरपूरच्या विठ्ठला साठी तर काही लोक अगदी वैष्णोदेवी पर्यंत जातात. एवढ्या वेळेत जर आपण काम केले तर देशाला आर्थिक हातभार तर लागेलच, पण त्याचबरोबर स्वतःचाही विकास होईल देवाचे अस्तित्व तर सगळीकडे आहे. मग फक्त त्याचे दर्शन घेण्यासाठी सगळे काम सोडून मंदिरातच का जायचे.
Work is worship
हेच आम्हाला शिकवले जाते आणि आमच्या मनावर बिंबवले जाते. आपण आपले कार्य करत राहिलो ,तरच आपल्याला सुख, समृध्दी व सन्मान मिळेल आणि आपण आनंदात राहू. ह्यातूनच आपल्याला समाधान मिळते.
पण खरंच आपण समाधानी आहोत का ? आपण सर्व सुख- सन्मान मिळवून सुद्धा समाधानी नाही. कारण आपण आपल्या गरजांच्या कक्षा वाढल्या आहेत. आई जेव्हा पंढरपूर वरून आली तेव्हा तिच्या चेहर्यावर जे दिसले ते खरे समाधान. कारण ती तिच्या जबाबदार्या रोजच पूर्ण करत होती. पण, आज तिने स्वतःचे समाधान मिळवले होते. आपण आपल्या ऑफिसमध्ये किंवा हॉस्पिटल मध्ये सुद्धा देऊळ बघतोच. कारण आपल्या आपली देवावर भक्ती आहे.
“भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा”
जर ,तुम्ही देवाला मानता तर, तुम्ही त्याची मनापासून भक्ती करावी एवढीच देवाची इच्छा असते. तुम्ही देवळात जा किंवा नका जाऊ ,त्याच्यासाठी सर्व गोष्टी सारख्या असतात. तुमच्या कुठल्या कामात तुम्हाला जर अपयश आले ,जीवनात नैराश्य आले, संकटं आली तर देवाची धाव तुम्ही घेताच. तसंच कधी कुठल्या गोष्टीत यश मिळालं ,तरी सुद्धा देवाचे आभार मानले जातात.
तुमची कामे देव करत नाही, तर ती कामे करण्याची शक्ती, बुद्धी, विचार…. देव आपल्याला देत असतो. देव आपल्याला सकारात्मक दृष्टी देत असतो. मग तुम्ही देवाची प्रार्थना कुठूनही करा, कसेही त्याचे आभार माना तो सदैव तुम्हाला आशीर्वाद देत राहील. सचिन तेंडुलकर मैदानात जाताना, मैदानातून येताना किंवा शतक झाल्यावर त्याची बॅट उंच आकाशात झेपावतो. आकाशाकडे बघतो. ती त्याची देवाला धन्यवाद करण्याची एक पद्धत आहे. म्हणून एकमेकांच्या पद्धतीवर संशय घेत बसू नका तर एकमेकांच्यात असणाऱ्या देवाला धन्यवाद करा. प्रणाम करा. दुसऱ्याचा आदर करा .आपल्या भक्तीचे अवडंबर करू नका आणि ती भक्ती लपवूनही ठेवू नका. भावापाशी देव उभा सर्वकाळ.