इ. १० चा निरोप समारंभ (SSC २०१९)

दि. २० फेब्रुवारी दुपारी ४ वाजता – ज्ञानसंवर्धन विद्यालय, अमरावती – शिक्षकांची मनोगते – शालेय आठवणींना उजाळा – विद्यार्थ्यांची मनोगते

            दहावीचे वर्ष म्हणजे शाळेचे शेवटचे वर्ष.. आम्हा नववीच्या मुलांनी त्यांना निरोप देण्यासाठी एक छोटासा कार्यक्रम शाळेतच आयोजित केला होता. ज्यामध्ये आमचे नववीचे विद्यार्थी आणि शाळेतील शिक्षक सहभागी झाले होते. ह्या निरोप समारंभाची तयारी आम्ही महिनाभर आधीच सुरु केली होती.

            २० फेब्रुवारी दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम चालू झाला. सर्वच विद्यार्थी शिक्षकगण उत्साहात होते. दहावीचा वर्गातील सर्वच मुले-मुली तयार होऊन साडी व सूट घालून आलेले. कार्यक्रमाला आमची शाळा ज्ञानसंवर्धन विद्यालय – अमरावतीचे मुख्याध्यापक श्री. श्रीहरी ससाणे यांच्यासोबत शाळेचे वरिष्ठ व निवृत्त शिक्षकही उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन आमच्या वर्गातील विद्यार्थी मीरा व रमेश करत होते. त्यांनी सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात केली. स्वागत गीते व इतर काही गीतांनी कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर आमच्या “अ” तुकडीच्या मुलींनी सुरेख नृत्य प्रस्तुत केले.

            नृत्य गायनानंतर आमच्या शिक्षकांची भाषणे झाली, ज्यामध्ये प्रत्येक शिक्षकाने दहावीच्या या वर्षीच्या विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी आपापली मनोगते मांडली. ती मांडताना तर काहीजण भावुक झाले. त्यानंतर काही मजेशीर खेळ झाले. ज्यात शिक्षक, विद्यार्थी आणि सर्वांनीच सहभागी होऊन धमाल केली. संचालकांनी कार्यक्रमाचा समारोप केला.

 घड्याळात ८ वाजल्यानंतर मात्र सर्वानाच खेळून, नाचून, गाऊन भूक लागली होती. आम्ही जेवणावर तुटून पडलो. जेवणानंतर सर्वांनी फोटो काढले. सर्व जण शिक्षकांसोबत आपापल्या ग्रुप सोबत फोटो काढू लागले. आपल्या शाळेसोबतचा फोटो सर्वांना आठवण म्हणून हवा होता. दहावीच्या सर्व मुलांनी शिक्षकांच्या पाया पडून शाळेचा निरोप घेतला.