जागतिक महिला दिन (Marathi Medium 2023)

८ मार्च जागतिक महिला दिन. तो साजरा करण्यासाठी शाळेतील सर्व महिला पालक आमच्या शाळेत जमल्या होत्या. ८ वी ते १० वीच्या सर्व महिला पालकांना निमंत्रण देण्यात आले होते. संध्याकाळी ४ वाजता सर्व महिला शाळेच्या सभागृहात जमल्या. शाळेतल्या सर्व महिला शिक्षिका व आमच्या मुख्याध्यापिका कार्यक्रमाला हजर होत्या. शिक्षिकांनी मुख्याध्यापिका बाईंच्या हस्ते कार्यक्रम चालू केला. मुख्याध्यापिका आणि काही पालक महिलांच्या भाषणाने कार्यक्रम सुरु झाला. आयोजकांच्या मदतीला आम्ही विद्यार्थी होतोच. मुख्याध्यापिका बाईंनी महिला दिनाचे महत्व सांगणारे भाषण दिले. महिला व शिक्षण याचे अतूट नाते समजावले.

प्रत्येकाला महिला दिनाकरिता एक विशेष संदेश लिहून आणायला सांगण्यात आले होते. ती संदेशाची चिठ्ठी प्रत्येकाने फलकावर लावली. महिलांचे दोन समूह करण्यात आले. प्रत्येक समूहाला एक छोटीशी नाटुकली सादर करायची होती. ज्याच्या तयारी करता फक्त १५ मिनिटे वेळ देण्यात आला. विषय होता “आजची महिला”. दोन्ही गटांनी नाटक सादर केले. सर्वांनी यात खूप हिरीरीने भाग घेतला.

त्यानंतर रस्सी खेच, डोंगराला आग लागली व अजून काही खेळ खेळण्यात आले. काही महिलांनी संगीत गायनाचा कार्यक्रम सादर केला. संगीत खुर्ची सारखे काही खेळ खेळण्यात आले. चहा पानानंतर कार्यक्रम समाप्तीच्या वेळी प्रत्येकाने ज्या चिठ्ठ्या आणल्या होत्या त्यातला विशेष संदेश घेऊन महिला निघाल्या. आपल्याला मिळालेला आनंद व संदेशासोबत सर्वच महिला परतल्या. माझ्या आईला जो संदेश मिळाला होता तो असा होता “पालक हो पण स्वतःचे बालकत्व विसरू नकोस”