पावसाळ्यातील एक दिवस (SSC २०२०)
निसर्गदृश्य – आनंददायी वातावरण – अविस्मरणीय दिवस
जूनची २१ तारीख होती. मंगळवारची सकाळ होती. नेहेमीप्रमाणे सकाळी ७ वाजता शाळा सुरु झाली होती. पाहिला तास मराठीचा होता आणि बाई शिकवत होत्या. तो संपला आणि गणिताचा तास सुरु झाला. गणिताच्या तासाला अचानक काळोख झाला. सकाळी ८.३० वाजता आम्ही विजेच्या प्रकाशात गणित शिकत होतो. बाहेर पावसाचे वातावरण झाले होते. आभाळ भरून आले होते. गणिताच्या बाई जश्या बाहेर गेल्या तसे आमचे चेहरे उजळले. कारण, गणितानंतर पी. टी. चा तास होता आणि आम्हाला मैदानात खेळता येणार होते.
आम्ही सर्व रांगेत मैदानावर गेलो. सूर्य लपला होता आणि अंधार झाला होता. मैदानात पोहोचतो न पोहोचतो तो मातीच्या सुगंधाने वातावरण भरून गेले. आणि मनात एक वेगळाच उत्साह निर्माण झाला. सगळे आनंदून गेले. पावसाचे थेंब लाल मातीवर पडत होते. तो पहिला पाऊस होता. पावसाळा ऋतू चालू झाला होता. तापलेली जमीन शांत झाली होती आणि तिच्या आनंदाचा सुगंध जणू सारे वातावरण भारावत होता.
आम्ही तिथेच थबकलो कुणीही मैदानात न जाण्याची सरांनी ताकीद दिली. आता पावसाचे टपोरे थेंब पडत होते. आम्ही पहिला पाऊस बघत शाळेच्या दारात उभे राहिलो. सर्व झाडे, पक्षी, पाने, माणस, प्राणी पावसाने न्हाऊन निघाले होते. अचानक आलेल्या पावसाने धांदल झाली. पण, पहिल्या पावसाचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर होता. आमचा पी. टी. चा तास संपला होता. वर्गात गेलो तरी पाऊस चांगलाच पडत होता. मधली सुट्टी झाली तरी बाहेर जोरदार पावसाची फलंदाजी चालूच होती. बाईंच्या शिकवणीसोबत पावसाची सुद्धा शाळा चालूच होती. शाळा सुटायला आता एक तास बाकी होता. पण पाऊस काही थांबला नव्हता. आता घरी कसे जायचे छत्री कुणीही आणली नव्हती. त्यामुळे आता सगळे काळजीत पडले. कारण, नवीन वह्या पुस्तके होती, ती भिजली तर…आपण भिजलो तर चालेल… हाच विचार प्रत्येकाच्या मनात चालू होता.
शाळा सुटली आणि सर्व सामान आवरून आम्ही शाळेच्या फाटकावर आलो, तर बाहेर पालकांची एकच गर्दी दिसली. खूप गोंधळ चालू झाला. प्रत्येक जण आप-आपल्या पालकांना शोधत होता. सर्व पालक छत्री, रेनकोट घेऊन आले होते. त्यांनी मुलांची दप्तरे घेतली. तशी आम्ही सर्व मुले पावसात भिजायला मोकळी झालो. पाऊस जोरात कोसळतच होता. आम्ही पावसात चिंब झालो. खूप खेळलो. आम्हाला कोणीही अडवले नाही. त्यादिवशी भिजत भिजतच घरी आलो. तो एकच दिवस होता ज्यादिवशी गणवेशात आम्ही पावसात भिजलो आणि साचलेल्या पाण्यात उड्या मारू लागलो तरीसुद्धा आम्हा मुलांना कुणीही अडवलं नाही. पहिल्या पावसात मजा करायला मिळाली म्हणून आम्ही मुलं खूप खुश होतो. पण पालकांची प्रचंड तारांबळ उडाली होती.