“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” या प्रसिद्ध वाक्याने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची ओळख होते. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी दिलेल्या योगदानामुळे त्यांना “लोकमान्य” ही उपाधी मिळाली, जी लोकांनी प्रेमाने दिली होती. ते एक थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ञ, आणि देशभक्त होते.
लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधरपंत आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. बालपणापासूनच टिळक अतिशय बुद्धिमान आणि जिज्ञासू होते.
टिळकांचे शिक्षण पुण्यात झाले. वकिलीच्या शिक्षणादरम्यान त्यांनी ठरवले की शिक्षणाचा उपयोग समाजकल्याणासाठीच करायचा. त्यांनी १८८१ साली पुण्यात मित्रांच्या मदतीने शाळा स्थापन केली. या शाळेत शिक्षण देताना देशप्रेम, राष्ट्रीय भावना आणि समाजसेवा यांवर भर दिला जात असे.
ब्रिटिश सरकारच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी टिळकांनी “केसरी” (मराठी भाषेत) आणि “मराठा” (इंग्रजी भाषेत) ही दोन वृत्तपत्रे सुरु केली. या वृत्तपत्रातून त्यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध जहाल लेख लिहिले, त्यामुळे इंग्रज सरकारने त्यांना सहा वर्षांसाठी मंडालेच्या तुरुंगात पाठवले ते एक जहाल मतवादी नेते होते. परंतु तुरुंगातही ते स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी तेथे “गीतारहस्य” हा अमूल्य ग्रंथ लिहिला, जो आजही प्रेरणादायी मानला जातो. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना “भारतीय असंतोषाचे जनक” म्हटले.
घरगुती स्वरूपात साजरा केला जाणारा गणेशोत्सव टिळकांनी सार्वजनिकरित्या साजरा करण्यास सुरुवात केली ज्यामुळे लोक जवळ येऊन जनजागृती झाली. शिव जयंतीलाही त्यांनी सार्वजनिक साजरे करून एक व्यापक रूप दिले. या उत्सवांमुळे लोकांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण झाली आणि स्वातंत्र्यलढ्यासाठी लोक अधिक संघटित झाले.
टिळकांनी बाल विवाह, अस्पृश्यता यांचा विरोध केला. त्यांच्या कार्यामुळे भारतीय समाजात प्रगती झाली. लोकमान्य टिळक हे खऱ्या अर्थाने स्वराज्याचे शिल्पकार होते. त्यांच्या कार्यामुळेच आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत.
टिळकांचे विचार आणि त्यांची तत्त्वे आजही आदर्श आहेत.लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अद्वितीय नेता होते. त्यांचे जीवन आणि विचार हे आजही प्रेरणा देणारे आहे.