कथालेखन (SSC २०२२)
मुद्दे : एक गरीब मुलगा – शाळेची फी भरण्यास पैसे नसणे – सकाळी पेपर टाकण्याचे काम – वाटेत पैशाचे पाकीट मिळणे – प्रामाणिकपणे पोलिस स्टेशनवर नेऊन देणे – पाकिटाच्या मालकास आनंद – बक्षीस.
प्रामाणिक मधू
जिल्हा परिषदेच्या शाळेत मधू तिसरीच्या वर्गात शिकत होता. त्याच्या घरची परिस्थिती खूप हलाखीची होती. त्याचे वडील एका गॅरेज मध्ये काम करत होते तर आई घरकाम किंवा मजुरी करे. त्यांचे घर कसेबसे चाले. त्यामुळे शाळेच्या फी साठी पैसे पुरेसे नसत. तेव्हा मधुने ठरवले की आपण आई-बाबांना मदत केली पाहिजे. त्याने घरोघरी पेपर टाकण्याचे काम स्वीकारले. पहाटे ४ वाजल्यापासून ६ वाजेपर्यंत मधू घराघरात जाऊन पेपर टाकत असे. हे काम फार कष्टाचे होते. पण मधू कधीही न चुकता ३.३० ला उठून, नाक्यावरून पपेरचा गठ्ठा घेऊन गावभर फिरे. ६.३० ला येऊन शाळेची तयारी करे. आणि ७ वाजता शाळेत जाई. अशाप्रकारे त्याच्या आईबाबांना तो हातभार लावत होता.
एके दिवशी सकाळी काम उरकून घरी परतत असताना रस्त्याच्या कडेला पडलेले पैशाचे पाकीट मधूला सापडले. ते पाकीट खोलून पाहिल्यावर त्याला त्यात बरेच पैसे आढळले. तो विचार करू लागला कोणाचं बरे असेल हे?? किती नुकसान होईल ज्याचे पाकीट आहे त्याचे? असा विचार करून तो लगेच पोलिस स्टेशनला गेला. आणि त्यांनी हकीकत सांगितली व निघाला.
काही दिवसांनी मधूला शोधत एक व्यक्ती पोलिसांसोबत घरी आली. ती व्यक्ती म्हणजे मधूला सापडलेल्या पाकिटाचे मालक होते. त्यांना त्यांचे पाकीट मिळालं म्हणून ते खूप आनंदात होते. इतका सच्चा, प्रामाणिक मुलगा असू शकतो, यावर त्यांचा विश्वास बसेना. मधूला पाहून, त्याची घरची परिस्थिती पाहून त्यांना वाटले, याला गरज असूनही त्याने पाकीट पोलिस स्टेशन मध्ये आणून दिले. खरंच! किती प्रामाणिक मुलगा आहे हा… त्यांनी मधुच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी उचलली आणि मधूला शाळेत जाऊन फक्त अभ्यास करण्याची प्रेमळ ताकीद दिली.