You are currently viewing देशी विरुद्ध विदेशी
देशी विरुद्ध विदेशी

देशी विरुद्ध विदेशी

आत्मनिर्भर भारत“चा नारा पंतप्रधान मोदींनी दिल्यानंतर आपण खरोखर देशी बनावटीकडे लक्ष द्यायला लागलो खरे. पण त्याचा अंगीकार अजून पूर्णपणे करणे कठीण आहे, जवळ जवळ अशक्य आहे. जागतिकारणामुळे जग एवढं जवळ आले आहे. आपल्या देशातील कुठले आणि विदेशी कुठले याची तुलना करणे आणि उपयोग करणे सहज शक्य आहे.  फोन कुठला वापरायचा देशी विदेशी? खाण्यामध्ये पिझ्झा पास्ता कि वरणभात भाजी?  शाळेत शिक्षणासाठी माध्यम कुठला मराठी कि इंग्रजी? फिरायला कुठे जायचं गावी ? बाहेरगावी? देशात ? कि परदेशात?  असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात.

नवनवीन गोष्टी बघण्याच्या, अनुभवण्याचा, अंगिकारण्याचा मानवी स्वभावच आहे. जे आपल्याकडे नाही त्याचे कौतुक, कुतुहूल वाटून ते आजमावण्याचा सवयीतूनच विदेशी, दुसऱ्याची गोष्ट (जी आपल्याकडे नाही) वापरण्यात काय हरकत आहे असं आपल्याला वाटत असतं. एखाद घड्याळ, कापड, गाडी, फोन, वस्तू देशी बनावटीची म्हणजे ती निकृष्ट आणि विदेशी बनावटीची म्हणजे अप्रतिम असते असा आपण समज करून घेतलेला असतो.

पण भाषेच्या बाबतीत अस होत नाही. इंग्रजांनी अनेक देशांवर राज्य केले. त्यांच्या राज्यावर कधीच सूर्य मावळत नव्हता. त्यामुळे इंग्रजी भाषेचा विस्तार जगभर झाला. भारतावर तर इंग्रजांनी शेकडो वर्षे राज्य केले आणि भारतातले सर्व व्यवहार, अभ्यासक्रम  इंग्रजीत झाले. त्यात मराठी सारख्या प्रादेशिक भाषा मागे पडत गेल्या आणि इंग्रजी या भाषेला प्राधान्य मिळाले.

जास्तीत जास्त व्यवहारात असणारी भाषा तिचीच वृद्धी होते, वाढ होते, व्याप्ती वाढते. मराठी भाषेची वृद्धी होण्याकरता ती जास्तीत जास्त व्यवहारात आणली पाहिजे. रोजचे व्यवहार हे मराठी भाषेतून झाले पाहिजेत. किंवा शाळेच्या अभ्यासक्रम हा मराठीत झाला तर आणि तरच मराठी भाषा टिकेल आणि येणाऱ्या पिढ्यांपर्यंत जाईल. लोकमान्य टिळकांनी सांगितल्याप्रमाणे १. मराठीचा व्यवहारात उपयोग व २. मराठी शिकणे आणि शिकवणे (मराठी अभ्यासक्रम) मराठीच मराठीपण टिकवून ठेऊ शकेल.

दुकानांवरील, रस्त्यावरील पाट्या मराठीत, बसचे क्रमांक मराठीत..पण आपली स्वाक्षरी ती मराठीत करतो का आपण? नाही कारण लहानपणापासून शिक्षणाचा श्रीगणेशाच आपण करतो ते A B C D  गिरवून. हस्ताक्षर, अक्षर , शब्द हे सगळं लिहिण्यासाठी कुठली भाषा जास्तीत जास्त वापरतो तर इंग्रजी… मराठीत शिकणे, मराठी लिहिणे, बोलणे हे मागासलेपणाचे लक्षण वाटू लागले आहे. इंग्रजी बोलणे लिहिणे हे प्रगतीच लक्षण किंवा Status Symbol झाले आहे.

इंग्रजीचा हात धरावा या जगात चाललेले, पाश्च्यात्त देशात होणारी नवनवीन संशोधने, विज्ञान, तंत्रज्ञान, विचारप्रणाली यांची माहिती होण्याकरता. व्यवसाय, रोजगार, उच्च शिक्षण यांची अनेक कवाडं खुली व्हावीत म्हणून पण मातृभाषेची नाळ मातृभाषेची साथ सोडू नये.