ज्या लोकांना दोन भाषा सराईतपणे बोलता येतात त्यांना द्विभाषिक म्हणतात, तर दोन किंवा जास्त भाषा बोलणाऱ्यांना बहुभाषिक म्हणतात. हल्ली बहुभाषिक असणे ही असामान्य गोष्ट राहिली नाही. जगभरात बहुतांशी लोकांना दोन पेक्षा जास्त भाषा बोलता येतात.
द्विभाषिक किंवा बहुभाषिक असण्याची खरी व्याख्या काय? ह्या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक व्यक्ती वेगवेगळे देईल. काही लोकांसाठी फक्त दोन भाषा बोलता येणे म्हणजे द्विभाषिक परंतु; काही लोकांना असेही वाटते की बोलण्याबरोबरच त्या भाषा लिहिता किंवा/आणि वाचता आल्या पाहिजेत. सर्वांचा त्याकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा असू शकतो. काही लोक जन्मतः त्यांच्या घरी दोन किंवा अधिक भाषा शिकत असतात. काही लोक शाळा-कॉलेज मध्ये नवीन भाषा शिकतात, तर काही नोकरी-धंद्याच्या निमित्ताने किंवा प्रवासामुळे नवीन भाषा शिकत असतात.
भाषा शिकण्यासाठी वयाचे काहीच बंधन नसते. आंतरजातीय विवाहामुळे भारतात द्विभाषिक किंवा बहुभाषिक लोकांची संख्या जास्त आहे. त्यात सुद्धा मातृभाषा आणि कामकाजासाठी बोलली जाणारी हिंदी भाषा बोलणाऱ्यांची टक्केवारी जास्त आहे. (अपवाद केरळ राज्य)
लहानपणापासून मुले एकमेकांच्या संगतीने, भोवतालच्या वातावरणामुळे अनेक नवनवीन शब्द शिकत असतात. अंक, रंग, प्राणी, महिने, सण हे व असे अनेक प्राथमिक शब्द मुले शाळेच्या माध्यमातून नकळत बहूभाषेत शिकत असतात.
महाराष्ट्रात जसे राज्य सरकारने शाळा कॉलेजेस् मध्ये किंवा सरकारी कामांमध्ये मराठी भाषा अनिवार्य केली आहे तसेच इतर राज्यांमध्ये गेल्यावर आपल्याला त्यांची भाषा अवगत करावी लागते.
भाषा हा खूप खोल व गहन विषय आहे. तुम्ही एकदा एखादी भाषा शिकलात तर आयुष्यभर ती तुमच्या बरोबर राहते आणि जशी जशी तुम्ही ती वापरात आणाल तसे तसे तुम्ही त्या भाषेत अगदी प्रबळ होत जाता. एखादी भाषा शिकण्यासाठी वेगळी काही तयारी करण्यापेक्षा जिथे ती बोलली जाते त्या प्रदेशात जाऊन जर शिकली तर त्याचे मूळ रूप आपण योग्य प्रकारे शिकवू शकतो.
जेव्हा एखादी व्यक्ती दोन भाषांमध्ये संवाद साधत असते तेव्हा ती व्यक्ती पूर्णपणे वेगळी भासली तर, ती व्यक्ती त्या दोन्ही भाषांमध्ये पारंगत आहे असे समजावे. महाराष्ट्र राज्याच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिलीची पाठयपुस्तके द्विभाषिक असणार आहेत. अर्थात मुलांना दोन भाषा आकलन करणे फार अवघड नाही. परंतु; पालक व शिक्षकांना ह्यात थोडे कष्ट घ्यावे लागतील. मुलांबरोबर बोलताना नेहमी दोन्ही भाषा वापराव्या लागतील. काही लोकांना वाटते की, लहान मुलांना दोन वेगवेगळ्या भाषांमध्ये शिकवणे चुकीचे आहे, त्यामुळे मुलांचा गोंधळ होऊ शकतो. पण खरेतर ह्यामुळे मुलांचा विकास होण्यास मदत होते. व्यवहारात उपयोगी पडणारी भाषा मुलांना शालेय जीवनात शिकवणे हे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. तसेच आपली पारंपारिक भाषा शिकल्याने मुले आपल्या संस्कृतीशी जोडलेली राहतात.
भाषा ही मुळात दोन तत्त्वांमध्ये शिकली जाते. एक म्हणजे ऐकणे आणि वाचणे, तर दुसरे म्हणजे बोलणे आणि लिहिणे. कुठल्याही गोष्टीचा थोडा सराव केला तर ती गोष्ट कायम आपल्या लक्षात राहते. भाषेचे सुद्धा तसेच आहे. सराव केला तर कुठलीही भाषा आपल्या कायम लक्षात राहते.