2020 च्या सुरुवातीला करोना विषाणू चा प्रादुर्भाव झाला आणि सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले. संसर्गजन्य विषाणू आणि त्यात औषध नाही ,लवकर बरा होत नाही, यामुळे सगळेच घाबरले होते . सरकारने सर्वात आधी गर्दीची ठिकाणे म्हणजे देवस्थाने आणि त्यापाठोपाठ शाळा बंद केल्या . मार्च महिन्याच्या मध्यंतरापर्यंत भारतातील सर्व शाळा-कॉलेज ,देवस्थाने, रेल्वे ,ऑफिस, सर्व काही सरकारने बंद केली होती. हळूहळू छोटी-छोटी दुकाने आणि कारखाने सुद्धा बंद पडले. जो जिथे असेल तिथे थांबा, असे सांगून अगदी महारस्त्ते सुद्धा बंद झाले.लोकांचं घराबाहेर पडणं बंद झालं.
शाळा बंद झाल्या म्हणून आम्ही खूपच खुश होतो. माझी ताई तर दहावीला गेली होती, त्यामुळे ती जास्तच खूष होती.पण दोन दिवसातच शाळेकडून निरोप आला की तुमचे ऑनलाईन क्लासेस चालू होत आहेत. अशी कोणती संकल्पना अस्तित्वात आहे, हेच आमच्या ध्यानीमनी नव्हते. पण शाळेच्याच वेळेवर ही आमची ऑनलाईन शाळा सुरू झाली. आधी दहावी बारावीचे वर्ग, तर हळूहळू आमचे पाचवी, सहावी आणि त्यामागोमाग अगदी बालवर्ग ,शिशुवर्ग सुद्धा ऑनलाइन सुरू झाले . माझे काही मित्र तर शाळा सुरू होण्याच्या दहा मिनिटे आधी उठून बसायचे ,तर काही जण आपला चेहरा दिसू नये म्हणून कॅमेरा बंद आहे किंवा कॉम्प्युटर बिघडला असे सांगायचे.
सुरुवातीला ऑनलाइन शाळा म्हणजे फी वसूल करण्यासाठी चालवलेला धंदा असे सगळे मोठी लोक म्हणत होती. सर्व शिक्षक कसे शिकवतात हे त्यांच्या लक्षात यायला लागलं होतं. त्यामुळे ऑनलाइन शाळा नकोच ह्या विचारातच सर्व होते पण खरी- खुरी शाळा काही लवकर चालू होणार नव्हती आणि विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून ऑनलाइन शाळा चालूच राहिल्या पाहिजेत हे सर्वांना पटू लागलं. खरं तर खूप वेळ मोबाईल आणि लॅपटॉप कडे नजर असल्यामुळे अनेक लहान मुलांचे पालक तक्रार करू लागले. मुलांच्या डोळ्यावर तर परिणाम होतोच पण त्यांच्या मेंदूवरही ताण येतो असे त्यांचे म्हणणे होते.
पण जी शाळा आम्हाला मोबाईल वापरू नका, इंटरनेटचा फार वापर करू नका, असे सांगत होती तीच शाळा आता मोबाईलवर भरत होती. म्युझिक, चित्रकला, हस्तकला, अगदी खेळ आणि डान्स सुद्धा वर्ग ऑनलाईन शाळेत होते. त्यामुळे वेळेचा अपव्यय होतोय त्यापेक्षा मुलांना कुठल्यातरी वेगळ्या गोष्टीत गुंतवा अशी पालकांची मागणी होती. पण तरीसुद्धा मुलांना खराखुरा शाळेचा अनुभव येत होता. आम्ही शहरात होतो त्यामुळे आम्हाला इंटरनेटची सेवा चांगली होती, पण जे लोक गावच्या ठिकाणी अडकले होते त्यांना मात्र या ऑनलाईन क्लासेसची डोकेदुखी वाटत होती .काही विद्यार्थ्यांना तर गावाला इंटरनेट साठी एखादा डोंगर सुद्धा चढायला लागला आहे. शिवाय क्लास चालू असताना मागे घरच्यांचे संवाद पण थांबायला पाहिजेत, नाहीतर कोण काय काय बोलतोय तेच कळत नाही . कधी अचानक शिक्षकांचा आवाज बंद होतो ,तर कधी अचानक मुलांचा. त्यामुळे खूप गोंधळ व्हायचा कधी कधी.
तरीसुद्धा या सर्व गोष्टींमध्ये शिक्षकांचे खरच आभार मानले पाहिजेत. त्यांच्या जीवनात कदाचित कधीतरी त्यांनी कॅमेरा चा सामना केला असेल, पण आता त्यांना कॅमेरा समोर उभे राहून मुलांना सर्व गोष्टी व्यवस्थित समजण्याचा प्रयत्न करावा लागायचा. गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय ऑनलाइन शिकवण्यासाठी खूपच अवघड होते पण असे असतानाही शिक्षकांनी खूप मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना सर्व समजावण्याचा प्रयत्न केला. मुलांचे वर्ष वाया जाऊ नये, शिवाय मुलांना सतत कुठल्याही गोष्टीचा कंटाळा येऊ नये,अशी सुद्धा काळजी शिक्षकांनी घेतली.
जीवन गाणे गातच राहावे,
पुढे पुढे चालावे. ऑनलाईन क्लासेस मुळे विद्यार्थ्यांचे आयुष्य थांबले नाही उलट मुलांना नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.