“उठा राष्ट्रवीर होवूया
सज्ज व्हा उठा चला,
सशस्त्र व्हा उठा चला”
हो प्रत्येक सैनिक हा ‘राष्ट्रवीर’ असतो. आम्ही राष्ट्राचे रक्षण करतो. देशाच्या सीमेचे शत्रूंपासून, अडचणींपासून आणि कधीकधी संकटात अडकलेल्या देशवासीयांचे संकटांपासून आम्ही रक्षण करतो. सैनिक जो नेहेमी तयार असतो, जागृत असतो कोणत्याही क्षणी. कशासाठी? स्वतःसाठी नाही तर देशासाठी, देशहितासाठी.
आमची सैन्यात भरती हीच खूप निकषांवर होते. ते निकषांचे अडथळे पार करून आम्ही जेव्हा सैन्यात दाखल होतो तेव्हा अजून कठीण परिक्षा आम्हाला द्याव्या लागतात. देशातल्या अनेक भागांतून मुले-मुली प्रशिक्षणासाठी एकत्र येतात. या सैनिकी प्रशिक्षणासाठी शारीरिक क्षमतेचा कस लागतो. शरीर आणि मन दोन्ही सुदृढ असावं लागतं. असे अनेक प्रशिक्षणाकरिता आलेले युवक मनाने खंबीर असले की ते प्रशिक्षण वेळेत पूर्ण करतात व सेवेत रुजू होतात.
सैन्याच्या मूळ तीन शाखा आहेत, थलसेना, नौसेना व वायुसेना. यामधल्या वायूदलात मी आहे. वायुदलामध्ये मला २२ आठवड्यांचे प्रशिक्षण दिले गेले. वायुदलात मी तीन टप्प्यात प्रशिक्षण घेतले. तीसऱ्या टप्प्यात वैमानिक लढाऊ विमान, हेलिकॉप्टर व वाहतूक विमान उडविण्याच्या विशेष अभ्यासात पाठविले जाते. खूप अभिमान वाटतो जेव्हा आपण देशाकरिता काम करत असतो. देशासाठी रात्रंदिवस सेवा देत असतो. सैनिक म्हणून माझे मित्र, नातेवाईक यांना माझा खूप अभिमान वाटतो.
२२ एप्रिल रोजी पेहलगामला फिरायला आलेल्या सामान्य नागरिकांना काही आतंकवादी लोकांनी नाहक मारले. बातमी एकताच आमच्या सर्वांचे रक्त सळसळले. मनाने तर आम्ही तयार होतोच पण सैन्यप्रमुखांचे आदेश आल्यानंतर आम्ही सशस्त्र तयार झालो. पाकिस्तान मध्ये घुसून हल्ला करण्याची संधी मी अजिबात गमावली नाही.
पण मला वाटतं देशात राहणारा प्रत्येक नागरिक हा सैनिक असतो. सैनिक होण्यासाठी सीमेवरच तैनात असायल हवं, असं काही नाही तर देशाची काळजी आपल्यापरीने घेणे सुद्धा पुरेसे आहे. देशाच्या रक्षणाकरिता युद्धात सहभागी होणे कुठल्याही सैनिकाचे स्वप्न असते. त्यात लढता येणे हे आम्ही आमचे भाग्यच समजतो. त्यात कामी आलो की आमचे जीवन सफल झाल असं मानतो. पण युद्धाशिवाय या विश्वाचे प्रश्न सोडवता आले असते तर…