पर्यावरण जतन काळाची गरज (मराठी माध्यम २०२२)

“वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरे।
पक्षीही सुस्वरे आळविती।।“

संत तुकाराम, आपल्या अभंगात वृक्षांचे मानवाशी असलेले नाते व वृक्षांचे महत्व संगितले आहेत. 

पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचा परिसर जमीन, हवा, पाणी, झाडे इत्यादी घटक. हे सर्व आपल्या जीवनासाठी गरजेचे आहेत. प्रगतीच्या वाटचालीकडे जाता जाता आपण या सृष्टीला, पर्यावरणाला पूर्णपणे विसरून गेलो आहोत.

माणसाने स्वत:च्या प्रगतीसाठी जंगलतोड सुरु केली. त्या जंगलतोडीचा परिणाम म्हणजे आज आपल्याला अनेक वन्यजीव नामशेष झालेले दिसतात. जमिनीची धूप होऊन तिची सुपीकता कमी झालेली आहे. शेत पिकांचा दर्जा कमी झालेला आहे.  महापूर, अवकाळी पाऊस यांसारखी अनेक संकटे आपल्यासमोर आ वासून उभी आहेत. ध्वनी, हवा, पाणी अशा अनेक प्रकारच्या प्रदूषणांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. मे महिन्यात पाऊस पडत आहेत तर डिसेंबर मध्ये गरम होत आहे. जागतिक तापमानवाढीची समस्या अधिक गंभीर होत चालली आहे. आणि त्याचे गंभीर परिणाम पर्यावरण आण मानवी जीवनावर होत आहेत. 

आपल्याला जगायचं असेल तर पर्यावरणाचं संवर्धन केलच पाहिजे. वृक्षतोड थांबवून, वृक्षारोपण केले पाहिजेत. ऑक्सिजनचे महत्व आपल्याला करोनाचा काळात कळून चुकले आहे. त्यामुळे नैसर्गिक स्त्रोत जसे पाणी, हवा यांचा वापर जपून केला पाहिजे.

शहरांमध्ये आता कचऱ्याची समस्या भेडसावत आहे. आपण निर्माण करत असलेल्या कचऱ्याचे प्रमाण कमी केले पाहिजे, ओला कचरा वेगळा करून त्यापसून इंधन किंवा खते बनवली पहिजे म्हणजे कृत्रिम गोष्टींचा वापर कमी होऊन प्रदूषण कमी होईल. एखादी वस्तू बदलण्यापूर्वी तिचा वापर शक्य तितका केला पाहिजे. प्लॅस्टिकचा वापर पुर्णपणे बंद केला पाहिजे.  

पर्यावरणपूरक, शाश्वत जीवनशैलीचा अवलंब केला पाहिजे. जसे कापडी पिशव्या वापरणे, अधिकाधिक नैसर्गिक घटकांचा वापर, इंधन बचत, ही काळाची गरज आहे. मनुष्यजात ही पर्यावरणाचा एक छोटासा घटक आहे. तेव्हा पर्यावरणाचा नाश म्हणजेच माणसाची हानी. पर्यावरणाचे संवर्धन यातच माणसाची उन्नती आहे.