चित्र काढण्याचा छंद – निसर्गाची चित्र – गुरूंचे मार्गदर्शन – कौशल्य प्राप्ती – कौतुक व बक्षीस – जाहिरात व प्रदर्शन

डॉक्टर, इंजिनिअर अनेकांना बनायचं असत… पण मला चित्रकार बनायचं आहे. मला लहानपणापासून वाटत होते… मी चित्रकार झालो तर…

चित्रकार म्हणजे एखादं चित्रं काढणारा, आपल्या कल्पनांना जिवंत रुप देऊन कागदावर साकारणारा. चित्रकार हा सृजनशील असतो असे म्हणतात. चित्रकारिता ही जन्मजातच येते. पण काही कला-गोष्टी सराव करूनही आपण आपल्या अंगी आणू शकतो. चित्रकलेचे प्रशिक्षण घेऊन मी नक्कीच ते आत्मसात करू शकतो. अनेक रंग वापरून चित्र रंगवणे हे मला खूप आकर्षित करते आणि ते साचेबद्धपणे कागदावर रंगांद्वारे मला उतरवता सुद्धा येईल.

निसर्गातले अनेक क्षण जसे, सकाळी उगवणारा सूर्य आणि संध्याकाळी मावळणारा सूर्य किंवा या दोन्हींमधल्या वेगवेगळ्या छटा टिपता येतील. पावसाचे जमिनीला भिजवणारे क्षण, हिवाळा, वसंत ऋतू व अनेक ऋतूंमधली निसर्गाची उधळण, झाडांची पान गळती, त्यांना येणारा बहर हे सारे मला चित्रांद्वारे दाखवता येतील.

माझ्या शिक्षकांकडून वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनाने मला नक्कीच एक उत्तम चित्रकार बनता येईल. मिलिंद मुळीक, दोंड सर यांसारखे अनेक निसर्ग चित्रकार आहेत. त्यांचे काम बघून मी शिकेन. स्वतःला सुधारत राहीन. अशी सुधारणा माझा चित्रकार म्हणून अनुभव आणि आनंद द्विगुणित करेल.  निसर्गातली प्रत्येक छटा टिपण्याच्या याच प्रयत्नामुळे सर्व माझे कौतुक करतील.

अनेक बक्षिसे माझ्या वाट्याला येतील. एक दिवस मी इतका मोठा चित्रकार बनेळ की, माझ्या चित्रांची प्रदर्शने भरतील. ज्यामध्ये माझे अनेक चाहते माझी चित्रे पाहून मंत्रमुग्ध होतील व मला भेटायला, माझा चित्रातील उणिवा सांगायला, माझे कौतुक करायला ते आतुर होतील. तो माझ्यासाठी एक चित्रकार म्हणून एक अविस्मरणीय क्षण असेल…