मोबाईलवर बंदी आली तर (CBSE 2024)

आजच्या युगात मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईलच्या मदतीने जग एका बोटावर आले आहे.  

जसे अन्न आणि पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही तसेच मोबाईलशिवाय जगणे अशक्य झाले आहे. शिक्षण, मनोरंजन, व्यापार, आरोग्य सेवा, माहिती आणि जगाशी संपर्क — हे सर्व मोबाईलमुळे सहज शक्य झाले आहे.

            शिक्षण, व्यवसाय, बँकेचे कारभार, जागतिक घडामोडी सर्व जग ह्या मोबाईलवर एकवटले आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी घरबसल्या शिकतात. आजारी असलेल्या व्यक्ती डॉक्टरांशी ऑनलाईन सल्ला घेतात. दूर असलेले नातेवाईक दूरचित्रवाणी अर्थात व्हिडिओ कॉलिंगने जवळ येतात. बँकेची सर्व प्रकारची कामे आता मोबाईल वरील बँकेच्या अॅप मध्ये केली जातात. जगभरातील घडामोडी काही क्षणांत आपल्या मोबाईलवर पाहता येतात.

            उपयुक्त नसलेली माहिती तर मिळतेच पण नको असलेली माहितीसुद्धा मिळते. सोशल मीडियावर जास्त वेळ घालवल्यामुळे खूप वेळ वाया जातो व अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. तर सतत मोबाईलचा वापर केल्याने डोळ्यांचे व मेंदूचे आजार होतात. मुलांमध्ये आळशीपणा, चिडचिड, आणि एकटेपणाची भावना निर्माण होते. सतत मोबाईल मध्ये गुंतून राहिल्यामुले मित्र नातेवाईक यांच्याशी संबंध कमी होतो आणि माणसांमध्ये दुरावा निर्माण होतो.

            मोबाईल बंद झाला तर मोबाईलवर निर्भर झालेल्या माणसाचे जगणे अशक्य होईल. लोकांचे दैनंदिन कामकाज अडकेल. शिक्षण, व्यवसाय, आरोग्यसेवा यावर परिणाम होईल. लोकांना जगाशी संपर्क साधणे कठीण जाईल आणि एकाकीपणा वाढेल.

            पण एक फायदा असाही होईल की पूर्वी प्रमाणे माणसे पुन्हा प्रत्यक्ष भेटायला लागतील, नाती घट्ट होतील आणि लोक निसर्गाकडे तसेच वाचन व  मैदानी खेळांकडे वळतील.

            माणसाला मोबाईल वर अवलंबून राहण्याची जी सवय लागली आहे ती सोडून, मोबाईलच्या आहारी न जाता त्याला एक उत्तम जीवन जगण्याचे साधन म्हणून वापरता आले पाहिजे. तरच जीवन सुंदर, सुखकर आणि सहज राहील….