“मुंबई नगरी बडी बाका तिन्ही लोकी वाजे तिचा डंका”
इसवी सन १९६०साली संयुक्त महाराष्ट्र चळवळी नंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुंबई या नवीन राज्याची राजधानी बनली. १९९५ साली या शहराचे नाव अधिकृतपणे बॉम्बे पासून मुंबई करण्यात आले. तसे तर लहान-मोठे सगळ्यांनाच मुंबईचे आकर्षण आहे .मुंबई हे नाव मुंबादेवी वरून पडले .
असे सांगण्यात येते की इंग्रजांच्या राज्यात त्यांच्या एका राजाने आपल्या जावयाला सात बेटे दिली होती. त्या सात बेटांची मुंबई झाली. म्हणजे मुंबई ही सात बेटांवर वसलेली आहे. मुंबईत आलेला प्रत्येक पर्यटक’ गेटवे ऑफ इंडिया’पासून आपली मुंबई सफर सुरू करतो. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला हे बांधण्यात आलेले स्मारक मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. १९११ मध्ये किंग जॉर्ज पाचवा व राणी मेरी भारत भेटीसाठी येणार होते ,तेव्हा त्यांचे स्वागत करण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया बांधले गेले होते.
मुंबईतील कमला नेहरू पार्क , वीर जिजामाता उद्यान , नेहरू प्लॅनेटोरियम , सायन्स सेंटर अशा विविध ठिकाणी लहान मुलांची सहल जाते . संजय गांधी राष्ट्रीय उद्यान , छोटा काश्मीर , मत्स्यालय हीसुद्धा लहानांच्या आवडीची ठिकाणे आहेत . मुंबईतील चौपाट्या , लेणी ,बागा , इतकच काय तर खाऊ गल्लीत सुद्धा फिरण्याची एक वेगळी मज्जा आहे . मुंबईचा ‘वडापाव’ तर संपूर्ण जगाला भुरळ घालतो. खरे दागिने , खोटे दागिने , खेळणी, या व अशा नानाविध वस्तू मुंबईच्या बाजारांमध्ये होलसेल मध्ये विकल्या जातात.
मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे . रिझर्व बँक , शेअर बाजार या भारताच्या आर्थिक संस्था मुंबईतच आहेत. रेल्वेचे जाळे असलेले मुंबई हे जगातले एकमेव ठिकाण आहे . गणेशोत्सव आणि दहीहंडी सारखे सण बघण्यासाठी लोक दूर दूर वरून येतात. इकडचे कोळी बांधव हे इथले स्थानिक लोक आहेत . पण आज या शहरात सर्व जाती धर्माचे लोक राहतात . गरीब-श्रीमंत सगळेच एकत्र येऊन सर्व सण-समारंभ आवडीने साजरे करतात .
मुंबईला मायानगरी सुद्धा म्हटले जाते, कारण हे खरोखरच स्वप्नांचे शहर बनले आहे . इथे खूप लोक आपले स्वप्न घेऊन येतात आणि इथलेच होतात . मुंबईच्या चित्रनगरीत तर हजारो लोक आपलं नशीब आजमवायला येतात . कुणी गायक ,कोणी दिग्दर्शक ,तर कोणी मोठ्या सुपरस्टार बनण्याचे स्वप्न उराशी घेऊन आलेले असते.
अशी ही सर्वेसर्वा असणारी मुंबई गुंड व माफियांच्या नजरेतून सुद्धा सुटलेली नाही. मुंबईची लोकसंख्या सर्वात जास्त आहे ,म्हणूनच माफियांची टार्गेट ठरते मुंबई. २६ नोव्हेंबर २००८ साली झालेला मुंबईवरचा हल्ला कुणीच विसरू शकत नाही.
ग्रॅनाईट ,बॉम्ब आणि गोळीबाराचे आवाज, रक्ताच्या थारोळ्यात पडलेली माणसे ,चहूकडे चाललेले मृत्यूचे तांडव, काहीच कधीच विसरू शकत नाहीत. त्याआधी १९९३ मध्ये ही संपूर्ण शहरात वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट करून लोकांना घाबरवण्याचे प्रयत्न केले होते. २००५ च्या २६ जुलैला महापूर आला होता. तेव्हा सर्व म्हणत होते मुंबईची तुंबई झाली.
अनेकदा झालेले बॉम्बस्फोट,महापूर या सगळ्यांचे साक्षीदार झालेली ,तरीही दिमाखात उभी राहिलेली मुंबई सर्वांची जाण आहे. पाण्याच्या काठावर माणसाचा समुद्र नेहमी हेलकावत राहतो ,लोकं येत राहतात आणि लोक आपल्या कामाला जात असतात. पण मुंबईचे स्पिरीट माणसांमध्ये शिगोशीग भरलय .कितीही मोठे संकट आले तरी सर्वजण जोमाने पुन्हा उभे राहतात आणि ही मुंबई कधीच स्थिर बसत नाही.