“Each moment of the year has its own beauty”.
‘ निसर्ग’ भारतावर खूपच दयाळू आहे. आपल्या भारतासाठी त्याने अनेक वरदान दिले आहेत. त्यापैकी एक वरदान म्हणजे, भारतातले तीन मुख्य ऋतू. भारत हा असा एकमेव देश आहे ,जिथे तीन ऋतू म्हणजे, उन्हाळा ,पावसाळा व हिवाळा तसेच, वसंत ,ग्रीष्म ,वर्षा ,शरद, हेमंत व शिशिर हे सहा उपऋतु आहेत.
ह्या बदलत्या ऋतू मुळे पृथ्वीवरती सजीव जन्माला आले. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणामुळे ऋतुचक्र चालू राहते. पृथ्वीचा अक्ष हा काटकोन नसल्याने सूर्याचे किरण पृथ्वीवर कमी-अधिक तिरपे पडतात . त्यामुळे तापमानात फरक पडतो आणि ऋतू बदलतात.
उन्हाळा
मला उन्हाळा आवडतो तो त्याच्या लांबलचक सुट्टीमुळे. उन्हाळा म्हटलं की शाळेला एक ते दीड महिना सुट्टी मिळणार, या विचारानेच मन प्रफुल्लीत होते. तसे उन्हाळ्यात तापमान हे खूप जास्त असते, पण असे दिवसही आपल्या आयुष्यात गरजेचे आहेत. कलिंगड ,खरबूज ,संत्री अशी अनेक फळे व त्याचा रस पिण्यात वेगळी मज्जा आहे. फळांचा राजा आंबा, ह्याची मी वर्षभर आवर्जून वाट पाहत असतो . त्याचा रस पिताना तर आमची शर्यत लागते. महिनाभर सुट्टी आल्यामुळे आम्ही सर्व भावंडे गावाला भेटतो. बाहेर ऊन असल्यामुळे आमचे आजी आजोबा आम्हाला फक्त सकाळी काही वेळा पुरतेच बाहेर खेळून देतात. आणि ऊन वाढू लागल्यावर कोणीच बाहेर पडत नाही.
दुपारच्या जेवणात आजीच्या हातचे चमचमीत जेवण आणि त्याबरोबर कैरीची फोड असा ठरलेला बेत असतो. जेवणानंतर बैठे खेळांचे डाव पडतात. त्यात कॅरम ,पत्ते ,बुद्धिबळ इतकच काय तर आजोबांनी शिकविलेले आठ च्ळ्ळस, सापसीडी सारखे जुने खेळ सुद्धा आम्ही खेळतो. कधी खेळून कंटाळा आला की, लहान गोष्टींची पुस्तके वाचण्यात आमचा वेळ घालवतो. कधी कधी आम्ही नाटक- नाटक किंवा शाळा-शाळा सुद्धा खेळतो.
एकीकडे आई ,काकू ,आजी असे सगळे महिला मंडळ पापड ,कुरड्या असे वाळवणीचे पदार्थ, तसेच लोणची ,मसाले असे वर्षभर साठवण्याचे पदार्थ बनवण्यात मग्न असतात तर, दुसरीकडे आम्ही मुलं त्यांच्या कामात त्यांना थोडी थोडी मदत करत असतो. आणि पाखरं येऊ नये म्हणून सर्व पदार्थांचे राखण करत असतो. संध्याकाळ झाली की आम्ही जवळच्या टेकडीवर फिरायला जातो किंवा विटीदांडू , गोट्या असे छोटे -छोटे खेळ खेळत असतो. रात्रीचे जेवण आम्ही छान अंगणात बसून घेतो. चंद्राच्या प्रकाशात बसून जेवणानंतर आजीच्या गोष्टी ऐकतो आणि तिथेच आम्ही झोपी जातो. अशी ही उन्हाळ्याची सुद्धा मजा काही औरच आहे……..
पावसाळा
पण मला आवडणारा ऋतू आहे पावसाळा. ग्रीष्म ऋतू मध्ये उन्हाने होरपळून निघाल्या नंतर सर्व सजीव वाट पाहत असतात, ती पावसाची .कधी एकदा पाऊस पडतो आणि वातावरणात गारवा निर्माण होतो, असे सर्वांना वाटत असते. आणि एकदा का हा पाऊस पडला ,की त्यात भिजण्याचा आनंद सर्वांना घ्यायचा असतो.
पहिल्या पावसाने मातीचा येणारा सुगंध वातावरण प्रफुल्लित करून टाकतो. पावसाळ्यात अनेक पक्षांचे स्थलांतर होत असते. त्यामुळे नवीन पक्षी सुद्धा लोकांना पाहता येतात. मोर जेव्हा त्यांचे पिसारे उंचावुन नाचतात ,तेव्हा तो क्षण नयनरम्य असतो. बेडकांचे येणारे डराव -डराव आवाज सारे आसमंत भरून टाकतो.
संपूर्ण सृष्टी हिरवी-गार झालेली असते. याच ऋतू मध्ये झाडे ,फळे ,फुले अगदी बहरून जातात. मका, ज्वारी , गहू यांची कणसे वाऱ्याबरोबर डोलू लागतात. नद्या-नाले आणि ओढे दुधडी भरून वाहू लागतात. याच पावसाळा ऋतु मध्ये सणांची सर्वात जास्त रेलचेल असते. सर्वात आधी सुरू होते ती आषाढातील वारकऱ्यांच्या वारीने. माऊली- माऊली करत सर्व वारकरी उत्साहाने नाचत असतात. ज्ञानबा-तुकाराम च्या जयघोषाने आणि टाळ्यांचा आवाजाने सारा आसमंत दुमदुमून निघतो. त्यामागोमाग 15 ऑगस्ट ,रक्षाबंधन, बैलपोळा हे श्रावणातील सण तर पर्वणीच घेऊन येतात.
वर्षभर ज्याची आपण आतुरतेने वाट बघतो तो गणेशोत्सव सुद्धा पावसाळाच घेऊन येतो. पाऊस कधी रिमझिम बरसतो ,तर कधी धो-धो कोसळत असतो. पावसाळ्यात रेनकोट घालून शाळेत जायची मजा सुद्धा काही औरच आहे. कागदाच्या होड्या बनवून वाहत्या पाण्यात सोडणे, डबक्यात उडी मारून एकमेकांवर पाणी उडवणे हे आमचे आवडते खेळ. कधीकधी तर खूप पाऊस पडुन शाळेला सुट्टी पण मिळते. आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य म्हणजे पावसाळ्यातील अगदी नयनरम्य दृष्ट असते.
असा हा पावसाळा ,जो वातावरणात गारवा आणतो, सणांची रेलचेल आणतो, धनधान्य पिकवतो, तो मला खूप प्रिय आहे.
हळुवार दाटती मेघ नभी
हळुवार पसरतो गारवा….
सर्वांग फुलते आगमनाने
भरून वाहतो मनी
स्पर्श नवा…. हर्ष नवा….
हिवाळा
लाल उन्हाळा गेला,
काळभोर गेला पावसाळा,
गुलाबी थंडी घेऊन आलाय,
हा ऋतू पहा हिवाळा….
-कवी रामभाऊ बैसाने
वातावरणात गुलाबी थंडीची चाहूल लागली की हिवाळा ऋतू सुरू होतो. पाऊस पडून गेल्यानंतर सर्व सृष्टी हिरवीगार झालेली असते. त्यात थंडी सुरु झाली की वातावरण अगदी प्रसन्न व लोभसवाणे वाटते .पहाटेच्यावेळी पडणारे धुके, झाडांच्या पानावरील दवबिंदू ,अतिशय नयनरम्य दृश्य असते. ऊस, बोर, हरभरा गाजर ,मोसंबी ,स्ट्रॉबेरी अशा फळांची व भाज्यांची रेलचेल असते. डिसेंबर महिन्यातील कुटुंबाबरोबर काढलेली सहल म्हणजे वर्षभराची ऊर्जाच जणू.
आरोग्याच्या दृष्टीने हिवाळा हा सर्वात उत्तम ऋतू समजला जातो कारण, हिवाळ्यात छान भूक लागते व खाल्लेल्या अन्नाचे चांगले पचन सुद्धा होते. त्यामुळे शरीराला चांगली ऊर्जा मिळते. त्यामुळे बहुतेक लोक किल्ले व गड यांची सफर हिवाळ्यातच करतात.
दिवाळी, संक्रांत, ख्रिसमस यासारखे सण सुद्धा हिवाळ्यातच येतात . दिवाळीला चकली, चिवडा असे तेलकट पदार्थ तर संक्रांतीला तिळाचे लाडू असे पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळे आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते व ही ऊर्जा आपण नंतर उन्हाळ्यात वापरू शकतो. शेतात होणारी हुरडा पार्टी तर सगळ्यांनाच आवडते. गावोगावी जत्रा भरल्या जातात ,कॉलेजमध्येही स्नेहसंमेलना सारखे विविध कार्यक्रम केले जातात. सर्व लोक एकमेकांना भेटतात . रात्र मोठी आणि दिवस छोटे होतात. त्यामुळे अशा गारव्यात पांघरून घेऊन झोपावेसे वाटते. सगळे शेकोट्या करून एकमेकांबरोबर गप्पा मारत बसतात. हिमालयातील परिसरात सर्वत्र बर्फ पडल्यामुळे लोक तिकडे फिरण्यासाठी जातात. बर्फात खेळण्याचा आनंद काही औरच.