हंबरून वासराले ,
चाटती जवा गाय तवा
मले तिच्या मधी
दिसती माझी माय……
स. ग .पाचपोळ
पाचपोळ यांनी लिहिलेली ही कविता सर्वांच्याच मनाला भिडणारी आहे. साठ वर्षाचे वृद्ध असो, पंचवीस वर्षाचा तरुण असो किंवा अगदी पाच सहा वर्षाचे लहान मूल असो, सगळ्यांनाच ह्या कवितेने आईचा खरा अर्थ समजावून सांगितला आहे.
‘माय’ ह्या शब्दातच इतकी माया ,आपुलकी आहे की प्रत्येकाला आपल्या आईची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आपल्याला जन्म देते, या सुंदर विश्वात आपल्याला जगायला शिकवते, संकटांवर मात करायला शिकवते ती व्यक्ती ,म्हणजे “आई “.
माझ्या आयुष्यातील मला सर्वात प्रभावशाली वाटणारी व्यक्ती म्हणजे माझी आई. माझी आई ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मला प्रत्येक गोष्टीसाठी आईचीच उपस्थिती हवी असते. ‘आई -आई ‘करून प्रत्येक गोष्टीसाठी मी तिच्या मागे मागे करणं मला आवडतं. घरात प्रवेश केल्यानंतर सर्वात प्रथम आईलाच हाक मारली जाते म्हणून तर ती घरात नसली की मी माझ्यातुन हरवलेले असते.
माझी आई एक यशस्वी स्त्री आहे. कुटुंब ,नोकरी ,नातेवाईक,सण- समारंभ ,सगळ्या गोष्टी यशस्वीरित्या व हसतमुखानं पार पाडते. सकाळी सर्वांच्या अगोदर ऊठूनही रात्री सर्वांच्या शेवटी ती झोपते.
असं म्हणतात की ईश्वराला सगळीकडे पोहोचणे शक्य नव्हतं ,म्हणून त्याने ‘आई’ला बनवले. म्हणून तर आपण सर्व गुरू पेक्षा आईला सर्वात मोठा गुरु मानतो. सर्वप्रथम आईची पूजा करतो.
मातृदेवो भव:
पितृदेवो भव:
आचार्यदेवो भव:
आतिथि देवों भव:
माझी आई मला सर्व काही शिकवते. घरातील कामं तर ती शिकवतेच, पण त्याच बरोबर बाहेरची कामे, व्यवहार-ज्ञान हे सुद्धा ती शिकवते. ती माझा अभ्यास पण घेते आणि माझ्याबरोबर खेळते सुद्धा. वेळप्रसंगी माझी चूक असेल तर मला ओरडते. मला माझी आई अष्ट-भुजा असणाऱ्या देवी सारखे वाटते. आजी,आजोबा, बाबा, दादा ,ताई सगळ्यां साठीच किती तत्परतेने हजर असते. सतत हसणारी आपली आई कितीही दमलेली असेल तरी मुलांचीच काळजी करते.
आईचे संस्कार तुम्ही कधीच विसरू शकत नाही. माणूस कितीही वाईट वागला तरी आईचे संस्कार त्याला चांगले वागण्यास मदत करतात. प्रत्येक आई साठी तिची मुले नेहमी लहान असतात. म्हणूनच, आपण मोठे झाल्यावर आपल्या आईची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही कितीही व्यस्त असाल तर फक्त आपल्या आईला प्रेमाने हाक मारून एकदा तिच्याकडे बघून हसलात, तरी ती प्रसन्न राहील.
स्वामी विवेकानंदांनी म्हटलेच आहे, “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी”
म्हणूनच आपल्या साठी जीव-तोड काम करणारी, आपल्यावर बिनशर्त प्रेम करणारी, आपल्या संकटात आपल्या बरोबर असणारी, तसेच आपले यश पाहून डोळ्यात आनंदाश्रू आणणारी, अशी एकच व्यक्ती आपल्या आयुष्यात असते, ती म्हणजे आपली “आई”.