राष्ट्रीय विज्ञान दिवस किंवा माझ्या शाळेतील विज्ञान दिवस
“संपला अंधार आता
सूर्य ज्ञानाचा उदेला,
लागल्या वाटा दिसाया
शक्ती लाभे चालण्याला ”
……… शंकर वैद्य
२८ फेब्रुवारी १९२८ साली भारताचे भौतिक शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरमण यांनी भौतिक शास्त्राच्या महत्त्वपूर्ण विषयावर शोध लावला. १९३० साली ‘रामन इफेक्ट’ या संशोधनाला नोबेल पारितोषिक मिळालं.
१९८६ मध्ये ‘नॅशनल काऊन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन’ आणि केंद्र सरकार यांनी मिळून विज्ञान दिवस साजरा करावा यासाठी विचारसरणी सुरू केली, व त्यानुसार १९८७ पासून दरवर्षी २८ फेब्रुवारी ,हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व नागरिकांना पटवून द्यावे ,लोक-कल्याणासाठी करण्यात येणारे वैज्ञानिक संशोधन लोकांसमोर मांडावे, हे प्रमुख उद्दिष्ट घेऊन विज्ञान दिन साजरा केला जातो. तसेच, विज्ञानाच्या प्रगतीसाठी आवश्यक तंत्राची चर्चा व्हावी, विद्यार्थ्याना विज्ञान क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन मिळावे ,त्यांना विज्ञानाप्रति आवड निर्माण व्हावी यासाठी आज देशभरातील शाळा व महाविद्यालय हा विज्ञान दिन साजरा करतात.
या दिवशी देशभरात विविध चर्चासत्रे ,परिषद ,प्रदर्शने अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ‘आपली बदलती पृथ्वी’, ‘टाकाऊ पासून टिकाऊ’, ‘निसर्गाचे पालन-पोषण’, ‘डी एन ए व आयव्हीएफ’, ‘लैंगिक समानता’ , ‘भौतिक शास्त्र’,’ रसायनशास्त्र’, ‘सुधारित पीक व अन्न-सुरक्षा’ हे व यासारखे अनेक विषय विज्ञान दिनाच्या निमित्ताने हाताळले गेले आहेत. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी वेगवेगळे विज्ञानाचे मॉडेल्स बनवून लोकांना माहिती देतात.
२०१९ च्या राष्ट्रीय विज्ञान दिवसाचा विषय होता “लोकांसाठी विज्ञान आणि विज्ञानासाठी लोक”. तर २०२० चा विषय होता “विज्ञानातील महिला”. विज्ञानात ज्ञानाला महत्त्व प्राप्त झाले आहे , म्हणूनच सर्वच प्रकारच्या ज्ञानाला विज्ञान म्हटले जात नाही. आत्ताचे युग हे विज्ञान युग मानले जाते. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात विज्ञानाच्या अविष्काराचा वापर केला जातो या यंत्रामुळे आपले जीवन सुविधा जनक व वेगवान बनले आहे.
आज आपण संगणक आणि मोबाईल च्या साह्याने घर बसल्या काम करू शकतो, अगदी शाळा सुद्धा चालू शकतो,जगातील कुठल्याही व्यक्तीशी संपर्क करू शकतो, कुणाचा अचानक मृत्यू झाला तर तो का व कधी झाला हे सुद्धा विज्ञानामुळे आपल्याला समजते. अगदी पर्यावरण जपण्यासाठी सुद्धा विज्ञानाची मदत घेतली जाते.
दोन दशकांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय विज्ञान दिनाला जणू राष्ट्रीय सणाचे स्वरूप आता आले आहे. थोडक्यात लहान-मोठे सर्वांना विज्ञान विषयी खुप आकर्षण आहे. संशोधन संस्थांनी पुढाकार घेतल्यास त्यांच्या उपक्रमांना मोठा प्रतिसाद मिळेल, हे विज्ञान दिवस साजरा करताना लक्षात येते.
“Science is the great antidote to the poison of enthusiasm and superstition”.