बालपणापासून ते माणसाच्या मरणापर्यंत आपल्याला अनेकजण मार्गदर्शन करतात. आपल्या जीवनातला अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञानरूपी प्रकाश दाखवतात. सर्वात पहिला गुरु आई असते. त्यानंतर आपल्याला लाभलेले शिक्षक आणि इतर मार्गदर्शक मंडळी गुरूच स्थान घेतात.

हीच गुरुची जागा निसर्ग हि बजावत असतो. निसर्ग म्हणजे जल, वायू, आकाश, भूमी आणि अग्नी या तत्वांनी बनलेली सृष्टी. सृष्टी म्हणजे “नियमितता”. जसे, दर सकाळी सूर्य हा आपल्याला दिसतोच व संध्याकाळी तो मावळतो. चंद्र उगवतो व मावळतो, ही नियमितताच सृष्टिचक्र टिकवून ठेवते. समुद्र, आकाश जसे अथांग, निश्चल आहेत तशीच ज्ञानाची खोली, विचारांची विशालता आपल्याला ते शिकवितात. एवढा विशाल असूनही गर्वाचे गालबोट त्यांना लागत नाही.

जमीन, पृथ्वी, भू-माता आपल्याला अन्न देते. एक दाणा पेरल्यावर शंभर दाणे करून देण्याची विकसनशीलता तिच्याकडून घ्यावी. पृथ्वी, झाडे, पाणी हे सगळे कायम आपल्याला देतच असतात. पण आपण झाडांना तोडतो, जमिनीत खड्डे करतो, त्यावर अनैसर्गिक प्रक्रिया करतो तरीही, हा निसर्ग आपल्याला देतच असतो.

पृथ्वी, झाडे, पाणी सहनशीलता, सोशिकता, कधीही हार न मानण्याची प्रवृत्ती शिकवतात.

या नद्या सतत वाहत असतात समुद्राकडे धाव घेत असतात. कितीही किंवा कसलेही अडथळे आले तरी नदी सतत वाहत असते. यावरून ती आपल्याला सतत परिश्रम करत राहावे हे शिकवते. नद्यांचे पाणी जरी प्रदूषित झाले तरी आकाशातून पडणारा पाऊस मात्र गोड स्वच्छ पाणीच देत. सौंदर्य, औदार्याचे हे धडे पदोपदी आपल्याला निसर्ग देत असते. हिरवी झाडे, निळा समुद्र, विशाल आकाश मनाला उभारी देत असत. सतत विकसनशील राहण्याची, सर्वांच्या कामी येण्याची, उंच उंच उडण्याची, उत्तुंग बनण्याची, जीवन उत्स्फूर्तपणे जगण्याची प्रेरणा देत असत.