प्रदूषण हा वातावरणातला असा बदल आहे ज्यामुळे, नैसर्गिक घटक दूषित होतात. हवा, पाणी, माती, ध्वनी हे प्रदूषणाचे काही प्रकार आहेत. जसजशी माणसाने प्रगती केली त्या प्रगतीसोबत एक गोष्ट निर्माण झाली ती म्हणजे प्रदूषण.

शहरांमध्ये चालणाऱ्या अनेक बांधकामांमुळे, औद्योगिक क्षेत्रातले धूर व वायू वातावरणात सोडले जातात त्यामुळे ध्वनी प्रदूषण होते. उदाहरणार्थ, दिवाळीत जे फटाके फोडले जातात त्या धूराने हवेचे प्रदूषण होते व त्यांच्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होते. फटाक्यांच्या आवाजाने, उद्योगांमध्ये चालणाऱ्या मशीन्समुळे, मोठ्या प्रमाणात संगीत, लाऊड स्पीकर वाजवल्याने ध्वनी प्रदूषण होते. रस्त्यावर वाहने वाढली आहेत, या वाहनांच्या हॉर्नमुळे सुद्धा ध्वनी प्रदूषण होते. हे ध्वनी प्रदूषण नियंत्रित नसल्याने शहरात राहणाऱ्या लोकांना मानसिक तणावा संबंधी समस्या वाढत आहेत.

पाणी प्रदूषण ही तर सध्याची ज्वलंत समस्या आहे कारण, नको असलेला सर्व कचरा, औद्योगिक कचरा, सांडपाणी, शेतीतील टाकाऊ पदार्थ, कीटकनाशके हे सर्व पाण्यातच सोडले जातात. कारखान्यातील केमिकल नदीच्या पाण्यात सोडले जातात. त्यामुळे नदीचे पाणी व पर्यायाने समुद्राचे पाणी प्रदूषित होत आहेत. या सर्वांमुळे समुद्रातल्या वन्यजीवांना धोका निर्माण होत आहे. पाणी प्रदूषित होत असल्याने शुद्ध पिण्याच्या पाण्याचा साठा कमी होत चालला आहे. प्रदूषित पाण्याच्या समस्येमुळे बऱ्याच प्रकारचे आजार वाढत आहेत.

भाज्या व फळे यांचे पीक चांगले यावे म्हणून अनेक रासायनिक खतांचा वापर केला जातो. अनेक प्रकारच्या कीटकनाशक, रासायनिक खत यांच्या वापरामुळे जमिनीच्या प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. जमिनीच्या दर्जा खराब होत आहे. ज्याचा परिणाम पिकांवर पडत आहे. दूषित भाज्या व फळे खाऊन वेगवेगळे आजार लोकांना होत आहेत.

हे प्रदूषण रोखण्याकरता झाडे लावली पाहिजेत व त्या झाडांचे संवर्धन केले पाहिजे. बायो डिग्रेडेबल म्हणजे निसर्गात सहजपणे कुजले जाणारे डबे खाण्याच्या वस्तूंसाठी वापरले गेले पाहिजेत. औद्योगिक कचरा वातावरणात, पाण्यात, समुद्रात किंवा नदीत सोडणे बंद केले पाहिजे. ऊर्जेचा वापर कमी केला पाहिजे. विजेवर चालणारी किंवा सायकल वापरली गेली पाहिजेत. एक वेळ वापरात येणारे प्लास्टिक कमी केले पाहिजे. प्रदूषण कमी व्हावे या करता लोकांमध्ये जागृती निर्माण केली पाहिजे.