“अमृत रुपी पाण्याविना
जिव होतो बेजार
जगण्याला श्वासा इतका
पाण्याचा आधार”
निसर्गाने आपल्याला दिलेले एक अनमोल रत्न म्हणजे पाणी. जसे जगण्यासाठी श्वास घेण्याची गरज आहे ,तसेच पाण्याचीही गरज आहे. आपण अन्न न घेता जगू शकतो पण पाण्याविना जगू शकत नाही. पाणी हे प्राणी व वनस्पतींच्या सर्व जैविक प्रक्रियेतील आवश्यक घटक आहे. आपल्या शरीरात ६०टक्के ते ७० टक्के पाणी असते. आरोग्यासाठी तेवढे आवश्यक असते. म्हणूनच पाण्याला जीवन म्हटले आहे. पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण ७१ टक्के असून सुद्धा त्याचा वापर पिण्यासाठी करता येत नाही. पिण्याच्या पाण्याचे प्रमाण हे केवळ तीन टक्के आहे.
वाढती लोकसंख्या ,असमान वितरण आणि नैसर्गिक स्तोत्रांची कमतरता यामुळे पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण घटत चालले आहे. आपल्याला फक्त पिण्यासाठीच नाही ,तर शरीरशुद्धीसाठी, कपडे व भांडी धुण्यासाठी, घर परिसरात स्वच्छता राखण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. औद्योगिक क्षेत्रात ऊर्जानिर्मितीसाठी सुद्धा पाणी हेच माध्यम आहे.
जगातील सांडपाण्याचे प्रमाण वाढत आहे. पण दुसरीकडे मात्र भूजलाची पातळी कमी कमी होत आहे. गावांचे झालेले शहरीकरण, वाढते औद्योगिक व्यवसाय, पर्यावरणाचा ऱ्हास ,यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी होत आहे. वृक्षतोडीमुळे पाऊस कमी पडत आहे आणि जो पडत आहे, ते पाणी वाहून जात आहे व आपल्याला त्याचा उपयोग होत नाही. या सर्व गोष्टींचा परिणाम प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या या जलचक्रा वर होत आहे.
जिथे जीवन आहे ,अशी पूर्ण विश्वात ही एकमेव जागा आहे. कारण पृथ्वीवर पाणी आहे, परंतु ज्या प्रमाणात भूजलाची पातळी कमी होत चाललेले आहे, त्यानुसार पृथ्वीवरील पाणी लवकरच संपण्याची शक्यता आहे. पाण्याच्या अभावी सजीवांना आपले अस्तित्व टिकवणे शक्य नाही. प्रयोगशाळेत पाणी निर्माण करता येते परंतु आवश्यकतेच्या प्रमाणात निर्माण करणे हे ,आर्थिक दृष्ट्या न परवडण्यासारखे आहे. पर्यावरणातील या असमतोलाने जीवसृष्टी संपुष्टात येईल, तापमानात वाढ होऊन वनस्पती सुद्धा नष्ट होतील. दर वर्षी धृवीय प्रदेशातील हिमपर्वत १० फूट या गतीने वितळत आहे. त्यामुळे समुद्राची पाणी पातळी वाढत चालली आहे. त्याचा सर्वात मोठा धोका हा, बेटे व किनारी प्रदेशातील भूभाग यांना होत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास म्हणजे जीवनाचा अंत. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेऊन सर्वांनी एकत्र येऊन पृथ्वीवरील पाणी वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दैनंदिन जीवनात प्रत्येकाने आपले कर्तव्य समजून पाण्याचा वापर विचारपूर्वक केला पाहिजे. वर्तमान व भविष्यातील गरज भागवायची असेल तर पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून सुद्धा काळजी घेतली पाहिजे. जलसंवर्धनाच्या वेगवेगळ्या पद्धती नुसार औद्योगिक व शेती व्यवसाय यांना लागणारे पाणी वाचवले जाऊ शकते. फक्त वृक्ष लागवड न करता त्यांचे संगोपन सुद्धा केले पाहिजे, ज्यामुळे नियमित पाऊस पडून पाणी जमिनीत जिरण्यात मदत होईल.