“वदनं प्रसाद सदनम
सदयं हृदयं सुधामूचो वाचः”
ज्यांचा चेहरा नेहेमी हसरा असतो, हृदय सर्वदा दयाशील असते, ते नेहेमी वंदनीय असतात. ते नेहेमी निरोगी असतात. देवाने फक्त माणसालाच दिलेल्या गोष्टी ,एक म्हणजे बुद्धी आणि दुसरी म्हणजे हास्य. या सृष्टीत दुसरा कुठलाही जीव हसताना दिसत नाही पण माणूस हसू शकतो. हि हसण्याची शक्ती फक्त माणसालाच मिळाली आहे.
एखाद्या माणसाकडे प्रथम पाहिल्यावर लक्ष वेधतात, ते डोळे आणि त्याचे हास्य. हास्यामध्ये दुसऱ्याला आपलंस करण्याची, व्यक्तीच्या जवळ जाण्याची जादू आहे. आजकाल Smilyes चे Emoji वापरण्यात पटाईत झालेलो आपण, चेहऱ्यावरचं हसू विसरत चाललो आहोत.आपलं हसणं कमी होत चाललं आहे.
हास्य म्हणजे काय? तर आनंद, सुख व्यक्त करणारी, मुखाच्या वरच्या बाजूला नेणारी तुमच्या चेहऱ्यावरची मुद्रा. पण, हास्याची खरी व्याख्या करायची झाली तर नकारात्मक भावना, चिंता, वेदना, दुःख कमी करणारी ,नाहीशी करणारी एक मुद्रा. सकारात्मकता, सद्भावना, आनंद, सुख, प्रसन्नता आपल्याबरोबर दुसऱ्यांना पुरवणारी एक मुद्रा.
हसू येत किंवा आपण हसतो ते एकत्र भेटल्याने, गप्पा-टप्पा मारल्याने. रोजच्या जगण्यातल्या गमती- जमती एकमेकांना मजेशीर प्रकारे सांगितल्याने. चार मित्रांचा घोळका एकत्र भेटला कि जी काही हास्याची कारंजी फुलतात कि विचारुच नका…त्यामुळे सतत हसत, आनंदी, प्रसन्न राहण्यासाठी मित्रांना, नतेवाईकांना भेटणे हे आलच.
आपला चेहऱ्यावर स्मित हास्य आणणारी अजून एक गोष्ट म्हणजे, आपल्या आठवणी…आठवणी म्हणून साठवलेले अनेक छायाचित्रे, व्हिडिओस, शुभेच्छा पत्रे….आपण आनंदात असताना टिपलेल्या असंख्य आठवणींना उजाळा देतात….त्या आपल्या नेहेमी जवळ ठेवाव्यात आणि वेळ मिळेल तेव्हा चाळत राहाव्यात.
आपल्या आजूबाजूला अनेक हास्यविनोदाचे कार्यक्रम, मेळावे, एकपात्री प्रयोग, नाटक, सिनेमे होत असतात. त्यातूनही हास्य विनोदाचा आनंद आपण मिळवू शकतो. अनेक विनोदी पुस्तके, साहित्य वाचनासाठी उपलब्ध आहे.
“माणसाचे केस गेलेले असले तरी चालतील, पण माणूस हा गेलेली केस नसावा.”
असे मिश्कीलपणे म्हणणारे पु.ल.देशपांडे. त्यांच्या “व्यक्ती आणि वल्ली” आणि इतर अनेक पुस्तकांमधील पात्रे आपल्या चेहर्यावर हास्य रेखा उमटवतात. चिं.वि.जोशी, प्र.के. अत्रे, द.मा.मिरासदार, शंकर पाटील हे सर्व लेखक मराठी विनोदी वाङ्मयाचे शिल्पकार आहेत.
अगदी हिंदी चित्रपट सृष्टीतले मेहमूद, असरानी, जॉनी लिव्हर, मराठीत -दादा कोंडके, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले, संजय नार्वेकर, भारत जाधव हे सगळे हसून हसून आपल्याला पोट धरायला लावतात.
“A day without laughter is a day wasted.” असं चार्ली चॅप्लिन म्हणून गेला. ज्याने लोकांना हसवणे हाच आपला धर्म मानला. कोणत्याही शब्दांशिवाय केवळ आपल्या देह बोलीने त्याने मूकपटातून अख्ख्या जगाला हसून हसून रडवल.
हसण्याने आपल्या मनाचा कल तर बदलतोच , पण एकाच्या हसण्यामुळे आपल्या जवळपासच्या माणसांचा पण मूड प्रसन्न , आनंदी होतो. सुदृढ मन व शरीरा साठी हसणं हा रामबाण उपाय आहे. केवळ हास्यमुद्रा केल्याने आपल्या शरीरावर सकारात्मक परिणाम होतात. कॅलरीज कमी होतात. हृदय व रक्तवाहिन्या सक्षम होतात. रोग प्रतिकार शक्ती वाढते.
सकाळी laughter क्लब मध्ये जाणारे अनेक लोक आपण बघतो. त्यांना वेगवेगळे हास्य व्यायाम करताना बघून आपल्याला आपसुकच हसू आवरत नाही.
हसत राहिल्याने आपण शरीराने आणि मनानेही तरुण राहतो. कुठलीही नकारात्मकता आपल्याला स्पर्श करू शकत नाही. त्यामुळे हसा आणि लठ्ठ व्हा……नव्हे नव्हे…हसा आणि निरोगी व्हा ….