जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली, तेव्हा जगात दोनच जाती होत्या. एक म्हणजे स्त्री आणि दुसरी पुरुष. या दोघांपासूनच पुढे समाजाची निर्मिती झाली. बालक जेव्हा मातेच्या उदरात जन्माला येते आणि त्याची वाढ होते, तेव्हा मातेचेच संस्कार त्याचावर होत असतात. म्हणजे स्त्रीच्या तेजामुळेच पुरुषाचे मोठेपण आहे. म्हणूनच स्त्रीचा आदर झाला पाहिजे. पुराणात देखील स्त्रीच्या महानतेचे अनेक दाखले आहेत. वैदिक काळातही स्त्रियांना पुरुषांसमान वागणूक दिली जात असे. त्यांच्या ज्ञानाचा, शौर्याचा, ममतेचा, त्यागाचा आदर केला गेला. गार्गी, मैत्रेयी, लोपमुद्रा इत्यादी याची उत्तम उदाहरणे आहेत; परंतु काळानुरूप काही धूर्त आणि समाजविघातक लोकांनी जातीव्यवस्था,वर्णभेद, लिंगभेद, अनिष्ट चालीरीती इत्यादींना खतपाणी घातले आणि हळूहळू संपूर्ण समाजव्यवस्थाच बदलून गेली.
‘पुरुषप्रधान’ संस्कृती जन्माला आली. आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी पुरुषांनी स्त्रीयांचे कार्यक्षेत्र फक्त ‘चूल आणि मूल’ इतकेच मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न एवढा अनाकलनीय होता की, त्यामुळे स्त्रियांचे अस्तित्वच धोक्यात आले. त्यातूनच मग सती, स्त्री-भ्रूण हत्या, हुंडाबळी, देवदासी, बहु पत्नीप्रथा, घरगुती हिंसाचार, बालविवाह या पद्धती जन्माला आल्या.
‘’ जिच्या हाती पाळण्याची दोरी,
ती जगाते उदधरी उद्धरी ”
तुकडोजी महाराजांच्या या दोन ओळीतून आपल्याला स्त्री शक्तीचे महत्व दिसून येते.
पण इथे मुख्य प्रश्न हा आहे की, स्त्रीला स्वत:ला या शक्तीची जाणीव आहे का? आणि जर असेल तर ती शक्ती किती स्त्रिया वापरतात आणि कुठे व कशा वापरतात?
आपण कितीही म्हणत असलो की, आजचा आपला समाज सुशिक्षित आहे, त्रगत आहे, पुढारलेला आहे, तरी प्रत्यक्षlत असं दिसत नाही. आजही मुलगी जन्माला आली की बरेच लोक नाराज होतात. त्यामुळेच स्त्री-भ्रूण हत्या रोखण्यासाठी कडक कायदे करावे लागतात. काही ठिकाणी मुलींना त्या ‘मुली’ आहेत म्हणून शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येते. पुरेसा सकस आहारही त्यांना मिळू शकत नाही. पुरेशी समज येण्याआधीच त्यांची लग्न लावून दिली जातात. त्यांना कुठलेही वैचारिक, आर्थिक स्वातंत्र्य दिले जात नाही. मग अशा माता कसा काय जगाचा उद्धार करणार?
म्हणूनच स्त्रियांनाही शिक्षणाचा अधिकार दिला पाहिजे. त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होण्यासाठी सकस आहार दिला पाहिजे. त्यांनी पुरेसा व्यायाम केला पाहिजे. आर्थिक, सामाजिक व्यवहारात त्यांनाही सहभागी करून घेतले पाहिजे. त्याबाबतचे पूर्ण ज्ञान आणि स्वातंत्र्य त्यांना दिले गेले पाहिजे. यासगळ्याची सुरुवात आपल्या घरातून सुरु झाली पाहिजे.
आज अनेक क्षेत्रात, किंबहुना प्रत्येक क्षेत्रात, स्त्रिया कार्यरत आहेत. आणि तेथे त्या आपल्या कर्तृत्वाने चांगला ठसाही उमटवत आहेत.पेट्रोलपंपांपासून ते अवकाशातल्या रॉकेट पर्यंत स्त्रीने झेप घेतली आहे. चहाची टपरी असुदे वा पंचतारांकित हॉटेल्स कुठेही तुम्ही स्त्रीचे कष्ट बघू शकाल. सत्यनारायणाची पूजा असो वा अंत्यविधी चे विधी असुदे तिची बुद्धीमत्ता लपून राहिली नाही.भारतीय सेनेतील कोणतेच असे क्षेत्र नाही जिथे आपण स्त्रीचे शौर्य बघू शकत नाही. लता मंगेशकर, माधुरी दीक्षित, कल्पना चावला, मदर टेरेसा, प्रतिभाताई पाटील यांची आज कोणालाही वेगळी ओळख करून दयावी लागत नाही. सासू म्हणून सुद्धा आज स्त्रीने आपली भूमिका बदललेली काही ठिकाणी दिसत आहे.
स्त्रियांमध्ये जन्मत: असलेल्या ममता, वात्सल्य, सोशिकपणा, सहनशीलता, सेवाभावी वृत्ती, यांमुळे त्या कुठलेही काम अगदी सहज आणि पुरुषांपेक्षा जास्त चांगल्या कौशल्याने पार पाडू शकतात. पण त्यांच्या सहनशीलतेचा काही पुरुष गैरफायदा घेताना दिसतात. बऱ्याचदा कामाच्या ठिकाणी आणि काही नात्यांमध्येही पुरुष स्त्रियांचा शारीरिक, मानसिक छळ करताना दिसतात. म्हणूनच मुलींना लहानपणापासूनच स्व-संरक्षणाचे पूर्ण शिक्षण दिले पाहिजे. स्त्रिया जेव्हा स्वतःचे संरक्षण स्वतः करू शकतील, तेव्हा त्या खऱ्या अर्थाने सशक्त झाल्या असे म्हणता येईल. जेव्हा त्या स्वतःच्या आयुष्याचे सर्व आर्थिक, वैयक्तिक निर्णय स्वतः घेतील तेव्हा त्या खऱ्या अर्थाने सशक्त झाल्या असे म्हणता येईल. यासाठी आई किवा सासू झालेल्या प्रत्येक स्त्रीने देखील दुसर्या स्त्रीला तेवढ्याच आदराने व मानाने वागवले पाहिजे. थोडक्यात सांगायचे तर,
नारी को नींदो नही,
नारी नर की खान
इसी खान से जन्म लिये
राम, कृष्ण, हनुमान l