१. पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.

(अ) माता धावून जाते जेव्हा बाळ आगीत पडते.

(आ) धरणीवर पक्षिणी झेपावते जेव्हा पिल्लू धरणीवर पडते.

(इ) गाय हंबरत धावते जेव्हा तिचे वासरू भुकेलें असते.

(ई) हरिणी चिंतित होते जेव्हा जंगलात वणवा पेटतो.

२. आकृती पूर्ण करा.

कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द 

उत्तर. माता- कनवाळू 

हरिणी- चिंतित

३. कोण ते लिहा.

(अ) परमेश्वराचे दास 

उत्तर. संत नामदेव

(आ) मेघाला विनवणी करणारा

उत्तर. चातक

(४) काव्यसौंदर्य

(अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.

‘सवेंचि झेंपावे पक्षिणी l पिलीं पडतांची धरणीं ll 

भुकेलें वत्सरावें l धेनु हुंबरत धावें ll’

उत्तर. या अभंगात संत नामदेवांनी स्वतःला बाळ आणि विठ्ठलाला आपली माऊली संबोधले आहे. जसे एखादे बाळ आगीत पडल्यावर त्याची कनवाळू माता धावते, पिल्लू झाडावरून पडल्यावर पक्षिणी धरणीं कडे झेपावते. आपले पाडस वणव्यात अडकलेले त्याला वाचवण्यासाठी हरिणी धावते. वासराला भूक लागल्यावर गाय हंबरते. तसेच विठ्ठल ही माझी माऊली आहे, माझ्या दुःखाचे -पापांचे निवारण करण्यासाठी विठ्ठलरूपी ‘आई’ तिच्या करुणेचा वर्षाव माझ्यावर नेहेमी करत असते.

(आ) आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दांत सांगा.

उत्तर. संत नामदेवांनी श्री विठ्ठलाला “माऊली” असे म्हटले आहे व स्वतःला “विठ्ठलाचा दास” असे संबोधले आहे. ज्याप्रमाणे माता बाळाची काळजी घेते ,बाळ संकटात असताना तिचा जीव कासावीस होतो त्याचप्रमाणे वणव्यात सापडलेल्या पाडसाला वाचवण्यासाठी हरिणी धावत जाते. झाडावरून पडलेल्या पिल्लाला वाचवण्यासाठी पक्षिणी झेप घेते. आई ही मूर्तिमंत करुणा आहे. विठू माऊलीने आपला सांभाळ करावा व आपल्यावर कृपा करावी असे संत नामदेवांना वाटते. अशा प्रकारे आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे वर्णन कवितेतून व्यक्त झाले आहे.

(इ) संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा.

उत्तर. संत नामदेवांनी श्री विठ्ठलाला “माऊली” म्हटले आहे. व स्वतःला विठ्ठलाचे मूल आहोत असा आशय अभंगात व्यक्त केला आहे. ज्याप्रमाणे वणव्यात सापडलेल्या पाडसाला वाचवण्यासाठी हरिणी धावत जाते, तसेच झाडावरून पडलेल्या पिल्लाला वाचवण्यासाठी पक्षिणी झेप घेते. त्याप्रमाणे श्री विठ्ठलाने पाण्याने भरलेले ढग घेऊन माझ्यावर मायेचा वर्षाव करावा अशी विनवणी संत नामदेव करतात.

(ई) पक्ष्याच्या/ प्राण्याच्या आपल्या पिलाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा.उत्तर. मी जेव्हा पाचवीला होते तेव्हा माझ्या बाबांनी कुत्र्याचे पिल्लू आणले होते. मी त्याला रोज संध्याकाळी माझ्या गोधडीत झोपायला घ्यायची. काही दिवस जेव्हा तो नवीन नवीन आला होता. तेव्हा मी त्याला घराच्या कोपऱ्यात बांधून ठेवायची पण मध्यरात्र झाली की तो भुंकायला सुरु करायचा. का काय माहिती बहुतेक त्याला थंडी लागत असावी.  मग मी त्याला माझ्या पांघरुणात घेऊन झोपायचे. खरंतर बाबांनी त्याला गावाला न्यायला आणला होता. १५ दिवस तो माझ्या घरी होता. शेवटी तो दिवस आलाच बाबा त्याला गावी घेऊन निघाले मी, माझा भाऊ खूप उदास झालो होतो. आम्ही त्याचे नाव ‘हिरा’ असे ठेवले होते .  हिरा देखील खूप नाराज दिसत होता. आता आम्ही गावाला जातो तेव्हा तो सतत आमच्या पाठी असतो.