You are currently viewing नवीन शिक्षण प्रणाली

नवीन शिक्षण प्रणाली

मानवाला आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच राष्ट्रीय विकासाला चालना देण्यासाठी शिक्षण’ हा पाया आहे. सर्वच क्षेत्रात जागतिक पातळीवर देशाचा व स्वतःचा दर्जा सर्वोत्तम ठेवण्यासाठी ‘दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे.

            जग वेगाने बदलत चालले आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या साह्याने सर्व क्षेत्रात पूरक बदल होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वच विषयातील ज्ञान किंवा कुशल असणाऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी वाढणार आहे.

            मुलांनी केवळ शिकणेच महत्त्वाचे नाही, तर ते कसे शिकायचे हे शिकणे जास्त महत्त्वाचे आहे. म्हणजेच तार्किक विचार करणे, समस्या सोडवणे, कल्पक असणे, नवनवीन व बदलणाऱ्या क्षेत्रातील सामग्री कशी आत्मसात करणे, परिस्थितीशी जुळवून घेणे या सर्व गोष्टी मुलांनी शिकणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात विज्ञान आणि गणित या विषयांप्रमाणेच भाषा, खेळ, कला, साहित्य, संस्कृती, स्वास्थ यांचा समावेश असणे अत्यावश्यक आहे.  

            नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण हे प्रत्येक नागरिकाच्या सृजनक्षमतेच्या विकासावर भर देणारे आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे शिक्षण घेता यावे यासाठी शिक्षण धोरणामध्ये विशेष तरतूद असली पाहिजे. फक्त आणि फक्त परीक्षेत गुण मिळवण्यासाठी शिक्षण नसावे तर शिक्षणात प्रत्येक विषयाची संकल्पना समजून देण्यात यावी.

            शिक्षक हे शिक्षण प्रक्रियेचे मूळ आहे. त्यामुळे त्यांची मानसिक, शारीरिक व व्यावसायिक तयारी असणे गरजेचे आहे. नवीन शिक्षण धोरणे मध्ये या सर्व गोष्टींचा विचार झालेला दिसतो.

 २०२०-२१ च्या शिक्षण धोरणानुसार प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण अर्थात ECCE वर भर देण्यात आला आहे. त्यामध्ये अक्षरे, रंग, संख्या मोजणे, हस्तकला, बोलक्या बाहुल्या, कला, कथा, कविता, खेळ, गाणी व इतर बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे.

            NCERT ने ८ वर्षे वयापर्यंतच्या मुलांसाठी दोन भागांमध्ये (म्हणजेच ० ते ३ वर्ष आणि ३ ते ८ वर्ष) असा शैक्षणिक आराखडा तयार केला आहे. त्यानुसार आठ वर्षे वयापर्यंतच्या मुलांना सुरुवातीपासून शेवटपर्यंतच्या अभ्यासक्रमात वाचणे, लिहिणे, बोलणे, मोजणे ,अंकगणित आणि गणितीय विचार यावर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. या नवीन धोरणामध्ये भाषेवर अधिक भर देण्यात आला आहे.

            लहान मुलांना आपल्या घरातील भाषा किंवा मातृभाषेत समजावले असता त्यांना कुठलीही संकल्पना लवकर समजते. त्यामुळे नवीन धोरणानुसार जिथे शक्य आहे तिथे किमान पाचवीपर्यंत आणि त्यानंतर आठवीपर्यंत शिक्षणाचे माध्यम घरातील भाषा /मातृभाषा/ स्थानिक भाषा किंवा प्रादेशिक भाषा असली पाहिजे, मग ती सरकारी शाळा असो वा  खाजगी.  शिवाय जरी घरातील भाषा किंवा मातृभाषेत पाठ्यपुस्तके उपलब्ध नसतील तरीसुद्धा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद हा घरातील भाषा किंवा मातृभाषेतच असला पाहिजे. जिथे गरज असेल तिथे द्विभाषी पद्धतीने शिकवले जाईल. मुलांना सुरुवातीपासूनच विविध भाषांची ओळख करून दिली जाईल. त्यात मातृभाषेवर विशेष भर दिला जाईल.  मातृभाषेतून मुलांना मुळाक्षरे, अक्षर ओळख, बाराखडी, कुटुंब, माझे शरीर, क्रिया, अंक, रंग, फळे, फुले, भाज्या, पक्षी, प्राणी, धार्मिक स्थळे, दिवस, वेळ, दिशा, ऋतू हे सर्व शिकवले जाईल. मातृभाषेतून वाचन आणि लेखन कौशल्य विकसित झाल्यानंतर तिसरीपासून पुढे इतर भाषांचे लेखन आणि वाचन शिकवले जाईल.

भाषेचे शिक्षण लोकप्रिय करण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाईल. नवीन शिक्षण धोरणात असेही म्हटले आहे की नाविन्यपूर्ण आणि अनुभवात्मक पद्धती वापरून भाषा शिकण्याची प्रक्रिया समृद्ध केली जाईल. यामध्ये विविध खेळांचे उपक्रम आणि उपयोजक म्हणजेच ॲप्सचा वापर करणे, तसेच वास्तविक जीवनाशी संबंधित अनुभवाचा संबंध जोडणे यांचा समावेश असेल. अशाप्रकारे भाषेचे शिक्षण अनुभवात्मक-अध्ययन, अध्यापनशास्त्रावर देखील आधारित असेल.